Wed, Apr 24, 2019 21:39होमपेज › Kolhapur › कृषी प्रदर्शनावरून सत्ताधारी-विरोधकांत वादावादी

कृषी प्रदर्शनावरून सत्ताधारी-विरोधकांत वादावादी

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मेरी वेदर ग्राऊंडवरील भीमा कृषी प्रदर्शनाच्या परवानगीवरून महासभेत गुरुवारी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत जोरदार शाब्दिक वादावादी झाली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. 

ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी 1980 राज्य शासनाने महापालिकेला विनामूल्य जागा ताब्यात दिली; पण महापालिका प्रशासनाने ग्राऊंड कोणकोणत्या कारणासाठी भाड्याने दिले. त्याचे पैसे महापालिकेने का गोळा केले, असा प्रश्‍न उपस्थित केला. आता 20 ते 30 जानेवारी या कालावधीत ग्राऊंड क्रिकेट स्पर्धेसाठी भाड्याने घेतलेली व्यक्ती दाखवा, असे अधिकार्‍यांना सांगितले. तसेच ग्राऊंड भाड्याने घेतलेली व्यक्ती कोण? त्याचा पत्ता काय? याची महापालिका प्रशासनाला काहीच माहिती नसल्याचा गौप्यस्फोटही कदम यांनी सभागृहात केला. 

किरण नकाते यांनी मेरी वेदर ग्राऊंडवर वर्षाला किती स्पर्धा होतात, असा प्रश्‍न उपस्थित करून कृषी प्रदर्शनामुळे आतापर्यंत किती वेळा मैदानाची दुरवस्था झाली? दुरवस्था झाली असली, तर मग संपूर्ण डिपॉझिट का परत केली? अशी विचारणा केली. संतोष गायकवाड यांनी ग्राऊंडचे मूळ मालक कोण, अशी विचारणा केली. किरण शिराळे यांनी मेरी वेदर ग्राऊंड कृषी प्रदर्शनासाठी भाड्याने देण्याबाबत प्रशासनाने कोणता निर्णय घेतला आहे, असे विचारले. इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले यांनी 2017 मध्ये महासभेत झालेल्या ठरावानुसार कळविले असल्याचे स्पष्ट केले. सुनील कदम यांनी शहरात चांगला उपक्रम होत असल्याने हेवेदावे बाजूला ठेवावेत, असे सांगितले.

अर्जुन माने, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी  चर्चेत भाग घेतला. 
सत्यजित कदम, उत्तुरे यांच्यासह इतरांच्या स्थायीसाठी निवडी स्थायी समितीत ताराराणी आघाडीचे गटनेता सत्यजित कदम व शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले यांच्यासह इतरांची निवड झाली. महासभेत त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांनी नावे दिल्यानंतर महापौर स्वाती यवलुजे यांनी त्यांच्या निवडी जाहीर केल्या. स्थायी समितीत काँग्रेसमधून संजय मोहिते, दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, ताराराणी आघाडीकडून कदम व सविता घोरपडे, भाजपमधून भाग्यश्री शेटके, गीता गुरव यांच्या निवडी झाल्या. परिवहन समितीत राष्ट्रवादीकडून चंद्रकांत सूर्यवंशी, काँग्रेसमधून अशोक जाधव, संदीप सरनाईक, सतीश लोळगे, भाजपमधून संतोष गायकवाड, ताराराणी आघाडीकडून महेश वासुदेव यांना संधी देण्यात आली आहे. लोळगे हे माजी नगरसेवक असून, नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वासुदेव हेही माजी नगरसेवक असून महाडिक यांचे ते समर्थक आहेत. महिला व बालकल्याण समितीत काँग्रेसमधून माधुरी लाड, सुरेखा शहा, छाया पोवार, तर राष्ट्रवादीकडून सूरमंजिरी लाटकर, शमा मुल्ला, भाजपमधून अश्‍विनी बारामते, मनीषा कुंभार, ताराराणी आघाडीमधून मेहजबीन सुभेदार व अर्चना पागर यांची निवड झाली. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होणार उद्यान
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कोल्हापुरात उद्यान व्हावे, असा ठराव शिवसेना नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले यांनी गुरुवारी महासभेत दिला होता. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. ई वॉर्ड सि. स. नं. 250/ब/14 व सि. स. नं. 250/ब/8 ही खुली जागा म्हणून स्पेसिफाय केलेली आहे. नागाळा पार्कमधील भक्तिपूजानगर येथील ओपन स्पेसमधील या खुल्या जागेवर सुशोभित उद्यान करून त्याला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान नाव द्यावे, असा ठराव उत्तुरे यांनी मंजुरीसाठी दिला होता.