Sun, Sep 23, 2018 14:09होमपेज › Kolhapur › गाईडसाठी प्रकाशकांना भरावी लागणार रॉयल्टी

गाईडसाठी प्रकाशकांना भरावी लागणार रॉयल्टी

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:32PMकागल : प्रतिनिधी

शालेय अभ्यासक्रमांच्या विविध विषयांच्या गाईडसाठी शासनाने प्रकाशकांना लायसन्सचे धोरण अवलंबल्यामुळे बाजारातून सध्या गाईड गायब झाले आहेत. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशित होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला तरीदेखील गाईड प्रकाशित झालेले नाहीत. गाईडबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गोची झाली आहे. गाईडच्या आधाराने अध्यापन करणारा गुरुजन वर्ग चिंताक्रांत झाला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रकाशकांसाठी लायसनिंगच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रकाशकांनी सरकारची ज्या वर्गांना पाठ्यपुस्तके असतील त्यातील प्रत्येक विषयाच्या गाईडसाठी प्रत्येक वर्षी प्रकाशकांना रॉयल्टी भरावी लागणार आहे. त्यामुळे प्रकाशकांनी अद्याप रॉयल्टी भरली नसल्यामुळे अद्याप गाईड बाजारात आणले नाहीत. त्याबाबत अद्याप अनिश्चितता निर्माण झाली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे. या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके प्रकाशित होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक हे दहावीची गाईड कधी येणार, याची चौकशी करीत आहेत. कारण दहावीचा नवीन अभ्यासक्रम असल्यामुळे गाईडची मदत घ्यावीच लागणार आहे. दहावी गाईडबरोबरच इतर विषयांचे नवीन गाईडही बाजारात आले नाहीत. त्यामुळे अध्यापन करणार्‍या शिक्षकांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यासाठी विक्रेत्यांकडे सातत्याने मागणी केली जात आहे आणि विके्रते प्रकाशकांकडे संपर्क साधत आहेत.

शालेय शिक्षण क्षेत्रात सध्या विविध प्रकाशनाच्या गाईडचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. अनेकांनी चांगला व्यवसाय सुरू केला आहे. मोठ्या प्रकाशकापासून छोटे - छोटे प्रकाशक तयार होऊन गाईडची एक समांतर शिक्षण व्यवस्थाच निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्याकरिता शासनाने रॉयल्टी भरण्याबाबतचे धोरण घेतले आहे. त्यामुळे शासनाच्या नवीन धोरणामुळे प्रकाशकांचे सध्या धाबे दणाणले आहेत. दरवर्षी मे महिन्यामध्येच प्रत्येक शालेय पुस्तकांच्या दुकानामध्ये गाईडचा साठा आलेला असतो. यंदा मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरीदेखील गाईडचा पत्ता नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडे शिक्षक विद्यार्थ्यांची सतत विचारणा होत आहे. मात्र, प्रकाशकांनी आपल्या विक्रेत्यांना पत्र पाठवून शासनाचे गाईडबाबत लायसनिंगचे धोरण आहे. मात्र अद्याप अनिश्चिततेचे वातावरण आहे. स्पष्टता झाली की, आपल्याला कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.