होमपेज › Kolhapur › बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर

बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बारावी परीक्षा निकालात शहरातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी यश संपादन करीत 95 टक्केवारी मिळविली आहे. परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींसह गुलालाची उधळण करीत निकालानंतर जल्लोष केला. एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातर्फे बुधवारी (दि. 30) दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. बोर्डाकडून मोबाईलवर निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, याचा अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतला. निकाल पाहण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांची नेटकॅफेंवर गर्दी होती. दुपारी एक वाजल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले होते.

विवेकानंद महाविद्यालयाने निकालाच्या गुणवत्तेत दबदबा कायम ठेवला. बारावीच्या परीक्षेत 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांवर गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थी चैतन्य कुलकर्णी याने 96.77 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अनिकेत केसरकर व मनीष सुतार यांनी 96.15 टक्के गुणांसह दुसरा, तर अक्षय राजाज्ञे व गौरव कुंभोजकर यांनी 96 टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखा : आकांक्षा ठाणेकर (94.31), राजनंदिनी साळोखे (90.46), सुशांत चव्हाण (89.38). आकांक्षा ठाणेकर हिने कला शाखेत सर्वाधिक गुण मिळविल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे. वाणिज्य शाखा : ऋचा पुजारी (94.30), सौरभ भोपळे (92.92), मेरिना जॉन (92.15).

कमला कॉलेजने बारावी परीक्षा निकालात यश संपादन केले. विज्ञान शाखा : 96.76 टक्के. पल्लवी जोशी (83.38), धनश्री पुजारी (83.20), स्वायमा बागवान (83.08). वाणिज्य शाखा : 99.20 टक्के. सोनाली पवार (87.38), प्राजक्‍ता कोगनुले (86.31), नीलम मोहिते (85.23). कला शाखा : 88.64 टक्के. खदिजा मुल्ला (88.15), वर्षा पाटील (84.92), जान्हवी जोशी (82.61).

महावीर महाविद्यालयाने बारावी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कला विभाग उत्तीर्णतेची टक्केवारी 70.08, वाणिज्य विभाग 87.66, तर विज्ञान विभागाची टक्केवारी 98.32 आहे. कला शाखा : फातिमा मुल्लाणी (77.38), अमृता जाधव (75.69), आकाश पाटील (71.38). वाणिज्य शाखा : मनीषा गीते (90.61), दिनेश ढोले (79.53), अरुणा पाटील (78.15). कला शाखा : शाबानअली शेख (78.76), रोहन दाभोळे (73.84), सिद्धी चव्हाण (73.69). 

स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा निकाल 99.72 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. रेवती पाटील (92.00), प्रथमेश हालके (88.46), सेजल यादव (88.30). वाणिज्य विभागाचा निकाल 99.41 टक्के लागला. सर्वेश कारेकर (83.53), विजया मुठे (81.23), ज्योती माने (80.76). कला विभाग निकाल 98.43 टक्के लागला. अस्मिता पाटील (89.38), मेघा कोळापटे (79.84), दिव्या चव्हाण (78.15).

छत्रपती शाहू विद्यालय व ज्यु.कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेतून 198 विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 58 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. 95 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत. कॉलेजमध्ये साक्षी कालेकर (92.92), सिया स्वामी (92.76), प्रज्वल पाटील (90.46) टक्के गुण मिळविले आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यु.कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल 98.32 टक्के लागला. अनुजा कदम (79.53), सारंग गव्हाणे (77.84), रूपम पांडे (77.53). कला शाखेचा निकाल 95.69 टक्के लागला. श्‍वेता लाड (84.92), शिवानी पाटील (82.61), वैशाली सुतार (79.23). विद्यापीठ हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा निकाल 93 टक्के लागला. विज्ञान शाखा : शिवानी घोरपडे (74.15), श्रीनिवास कुलकर्णी (70.30), मयूर रुमाले (69.23). कला शाखा : मयुरी संकपाळ (75.06), मानसी साबळे (74.06), प्राजक्‍ता भोसले (72.09). वाणिज्य शाखा : अश्‍विनी जाधव (79.69), स्नेहल पाटील (79.07), श्रुती पवार (78.46).

नाईट कॉलेज आर्टस् अँड कॉमर्सचा निकाल 65 टक्के लागला. कला शाखा : बिरू बदानी  (64.30), अमृता संकपाळ (64). अरबाज वडगावकर (63.07), असूद नदाफ (62.46). पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचा विज्ञान शाखेचा निकाल 97.26 टक्के लागला. विज्ञान (98.82), वाणिज्य (96.90), कला (93.54). डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल 94.45 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. राजाराम कॉलेजचा निकाल 97.55 टक्के लागला. विज्ञान (98.59), कला (93.61). न्यू कॉलेजचा निकाल 96.77 टक्के लागला. विज्ञान (98.62), कला (93.68), वाणिज्य (93.93). 

हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड संस्थेच्या घरोंदा वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकालात यश संपादन केले. बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. वसतिगृहातील 17 विद्यार्थी कला शाखेतील आहेत. 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्‍त केली आहे. हर्षद जाधव (67.23), किशोर गावडे (67.23), अनिकेत सोनवले (65.24), केदारनाथ पाटील (64.30).

मेघराजने करून दाखवले!

घरची परिस्थिती बेताची... लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले...ज्या वयात खेळायचे आणि आनंदात बागडायचे त्याच वयात परिस्थितीच्या अनेक झळा त्याने सोसल्या. आईची साथ आणि जिद्द या जोरावर अफाट कष्ट करून मुगडेवाडी (ता. पन्हाळा) येथील मेघराज विलास मुगडे याने बारावीच्या परीक्षेत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत वाणिज्य शाखेत 75 टक्के गुण मिळवत यशाला गवसणी घातली. लहानपणीच मेघराजचे वडिलांचे छत्र हरपले. आईने हाताला मिळेल ते काम आणि शेती करून त्याला शिकवले.शिक्षण घेत असताना परिस्थिती नेहमीच त्याला चटके देत राहिली. घरची परिस्थिती बेताची आणि आपल्याला शिकलेच पाहिजे ही जिद्द मेघराज उराशी बाळगून होता. प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्येदेखील त्याने लख्ख यश संपादन केले आहे. दहावीत त्याने 77.80 टक्के गुण प्राप्‍त केले. मिळालेल्या यशाने तो कधीच हुरळून गेला नाही. पुढील शिक्षणासाठी त्याने ग्रामीण भागातून शहराकडे प्रवास केला; पण परिस्थिती त्याच्या आड आली. त्याने चक्‍क वेटर म्हणून काम करत अकरावीत वाणिज्य शाखेत एस. एम. लोहिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

अकरावीत त्याने चांगले यश संपादन केले.बारावीत सुरूवाती पासून नियोजनबध्द अभ्यास त्याने केला. सकाळी 7.30 ते 11 पर्यंत कॉलेज आणि 2 तास अभ्यास असे मेघराजचे अभ्यासाचे नियोजन होते.सायंकाळी 4 वाजता ते रात्री 12 पर्यंत शिये येथील हॉटेलमध्ये तो कामासाठी जायचा.सुट्टीत आईला शेतातील कामासाठी मदत तो करत असे.मिळणार्‍या पगारावर शिक्षण आणि घर तो सांभाळत असे.जिद्द, नियमित अभ्यास या जोरावरच आपण बारावीत धवल यश संपादन केल्या दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.सीए होण्याचे त्याचे स्वप्न असून ते पूर्ण करणाच असा त्याने चंग केला आहे. 

अंध श्रद्धाचे लखलखीत यश

अंध असो किंवा गतिमंद मुले जन्माला आली की, पालक हताश होऊन बसतात; पण घोंगडे कुटुंबीयांनी जन्मताच अंध असणार्‍या श्रद्धावर ‘श्रद्धा’ ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत श्रद्धा सोमनाथ घोंगडे हिने आर्टस् शाखेत 81.25 टक्के गुण मिळवत डोळस यश संपादन केले. श्रद्धा ही जन्मताच अंध आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मिरजकर तिकटी येथील अंध शाळेत झाले. तिथेही तिने चमकदार कामगिरी केल्याने पालकांनी पाचवी व सहावीसाठी महानगरपालिकेच्या अहिल्या विद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबर श्रद्धाने गायन कला जोपासली. आई, वडील, शिक्षक यांनी तिच्या गायन कलेला दाद दिली. शिक्षणाबरोबर तिची गायन कलाही बहरत आहे. इयत्ता 7 वीनंतर पालकांनी तिला पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. गुणवत्तेची कास आणि गायनाचा ध्यास तिने कधीच सोडला नाही. अनेक नामांकित गायन स्पर्धांत भाग घेऊन श्रद्धाने प्रावीण्य मिळविले आहे.

अभ्यासाची आणि गायनाची गोडी लहानपणापासूनच आहे. तिला छोटी बहीण असून, तीदेखील इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. अंध असूनही श्रद्धाने जिद्द सोडलेली नाही. बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.इतरांनी अभ्यास वाचायचा आणि श्रध्दा तो ऐकत असे. कधी मोबाईलवर तो रॅकॉर्ड करून दिलेली ध्वनीफित ती ऐकत असे.त्याच बरोबर ब्रेललिपी देखील तिला फायदेशीर ठरली,असा नियमित अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.12 वीच्या वार्षिक परीक्षेत रायटर म्हणून मेघना बालिघाटे हिची साथ मिळाल्याने आपण यशोशिखर गाठल्याचे श्रध्दाने सांगितले. 

मूकबधिर सर्फराजचे बोलके यश

तो जन्मताच मूकबधिर... अस्सल चित्रकार... वडिलांचे छत्र हरपल्याने घरची परिस्थिती बेताची, असे असतानाही त्याने नाईट कॉलेजमध्ये शिकत बारावीत पन्‍नास टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली. सर्फराज नूरमुहम्मद बागवान असे त्याचे नाव असून, आझाद चौक परिसरात तो राहतो. सर्फराजचे प्राथमिक शिक्षण वि. म. लोहिया विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण एस. एम. लोहिया हायस्कूलध्ये पूर्ण केले. अकरावीला त्याने नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबर त्याने चित्रकला आत्मसात केली असून, अस्सल चित्रे तो रेखाटतो. अनेक स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसे मिळविली आहेत. चित्रकलेच्या अनेक परीक्षांमध्ये तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला आहे.

पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर आहे. आपण जरी मूकबधिर असलो, तरी जिद्दीने शिकून चांगली सरकारी नोकरी मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे. भाऊ आणि बहिणींचे त्याला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन मिळते आहे. दहावीतदेखील सर्फराज याने 71 टक्के गुण प्राप्‍त केले होते. नियमित कॉलेज आणि सरांनी दिलेल्या टिप्समुळे दहावीत यश मिळाल्याचे तो सांगतो.

मनीषाने केली परिस्थितीवर मात

घरची हलाखीची परिस्थिती... वडिलांकडून हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह... आई शेतमजूर... अशा बिकट परिस्थितीत महावीर महाविद्यालयातील मनीषा दशरथ गीते या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करीत वाणिज्य विभागात 90.61 गुण संपादन करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरात एका छोटेखानी खोलीत मनीषा कुटुंबासह राहते. वडील गेल्या काही वर्षांपासून लक्ष्मीपुरी व मार्केट यार्ड येथे हमाली व्यवसाय करून कुटुंब चालवीत आहेत. त्यांना हातभार म्हणून आईही शेतमजूर म्हणून कामाला जाते. घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने खासगी क्‍लास लावता आला नाही. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे ध्येय ठेवले. स्वत: नोटस् काढून नियोजबद्ध अभ्यास केला. आई-वडिलांसह नातेवाइकांनी शिक्षण घेताना मदत केली. मनीषाची शिक्षणातील धडपड पाहून महाविद्यालयाने तिला विशेष सवलत दिली. तसेच प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक यांच्या सहकार्यामुळे यश संपादन करता आले. यूपीएससी करून सनदी अधिकारी होणार असल्याचे मनीषा हिने सांगितले. 

सोशल मीडिया बनला ‘आधारस्तंभ’

बारावी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपासूनच सोशल मीडियावर कमी गुण मिळणार्‍यांना किंवा नापास होणार्‍यांना दिलासा देणार्‍या पोस्ट शेअर केल्या जात होत्या. त्यामध्ये ‘मार्क्स कमी मिळाले तर लक्षात ठेवा, मार्कशिट फक्‍त कागदाचा तुकडा आहे... पण तुम्ही मात्र तुमच्या आई-वडिलांच्या हृदयाचा तुकडा आहात...’, ‘रडायचं नाही... लढायचं...’ असे संदेश व्हायरल झाले होते.