Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Kolhapur › सहायक संचालक पदाचा कार्यभार पीएचसी डॉक्टरकडे

सहायक संचालक पदाचा कार्यभार पीएचसी डॉक्टरकडे

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 12:45AMकोल्हापूर ः विठ्ठल पाटील

प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी आणि सहायक संचालक हिवताप व हत्तीरोग या तिन्ही पदांची जबाबदारी एकच डॉक्टर सांभाळत असल्याचा प्रकार येथे घडला आहे. विशेष म्हणजे चार जिल्ह्यांचा प्रमुख या नात्याने सहायक संचालक हे पद वर्ग एकच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांभाळायचे असताना एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीएचसी) डॉक्टरांकडे पदभार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हे सहायक संचालकपद आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या पदाशी समकक्ष असणारे सहायक संचालक हिवताप व हत्तीरोग हे पद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे कसे, असा प्रश्‍न कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांतून उपस्थित केला जात आहे. या पदाचा कार्यभार जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सी.पी.आर.) निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांकडे देणे अपेक्षित असताना पीएचसीच्या डॉक्टरांकडे उच्च दर्जाच्या दोन पदांचा कार्यभार दिला गेल्याने वैद्यकीय क्षेत्रातील या भोंगळ कारभाराचा संताप व्यक्त केला जात आहे. काही डॉक्टरांनी याबाबत आरोग्य संचालकांसह आरोग्य मंत्र्यांचेही लक्ष वेधल्याने खळबळ उडाली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्येदेखील हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीत. पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात आणि ग्रामीण व डोंगराळ भागातील रुग्णांना उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार सातत्याने होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नेमावेत, अशी मागणी अनेक तालुक्यांतून होत आहे. जवळपास डझनभर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नसल्याने जिल्हा परिषदेचे काही सदस्य सातत्याने आवाज उठवत आहेत, पण तेथे डॉक्टर उपलब्ध करून दिले जात नसल्याची या सदस्यांची तक्रार आहे. असे असताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांकडे जिल्हा हिवताप अधिकारी आणि सहायक संचालक हिवताप व हत्तीरोग या चार जिल्ह्यांच्या पदाची जबाबदारी कशी काय दिली गेली, असा प्रश्‍न काही जि.प. सदस्यांनी उपस्थित करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर देण्याची मागणी केली आहे.