Sun, Aug 18, 2019 21:16होमपेज › Kolhapur › देशात इथेनॉल उत्पादनाचा विक्रम

देशात इथेनॉल उत्पादनाचा विक्रम

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात चालू हंगामातील उसाचे समाधानकारक उत्पादन आणि केंद्र शासनाने दिलेला किफायतशीर आधारभूत दर यामुळे यंदा देशात पेेट्रोलमधील मिश्रणासाठी इथेनॉल उपलब्धतेचा उच्चांक झाला आहे. इथेनॉलसाठी आवश्यक दोन्हीही घटक सकारात्मक झाल्याने देशातील साखर कारखाने व इथेनॉल निर्माते यांनी ऑईल कंपन्यांबरोबर तब्बल 113 कोटी लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचे करार केले असून ही उपलब्धता देशातील आजवरची उच्चांकी आहे.

जागतिक बाजारात इंधनाच्या वाढणार्‍या किमती आणि इंधनापोटी शासनाच्या तिजोरीतून खर्ची पडणारे परकीय चलन याला पर्याय म्हणून देशामध्ये पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचा पर्याय पुढे आणण्यात आला होता. यामध्ये परकीय चलनाच्या बचतीबरोबरच देशातील साखर उद्योगाला मोठा हातभार लागणार असल्याने केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये प्रथम 5 टक्के व नंतर 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमासाठी आवश्यक इथेनॉलची वाजवी आधारभूत किंमत जाहीर करण्याचे काम सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने केले.

त्यांनी इथेनॉलला प्रतिलिटर 48 रुपये दर जाहीर केल्याने 2015-16 मध्ये देशात पेट्रोलमधील मिश्रणासाठी 111 कोटी लिटर्स इथेनॉलची उपलब्धता होऊ शकली. यामुळे 5 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले. तथापि, त्यानंतर केंद्राने इथेनॉलच्या आधारभूत किमतीतही केलेली कपात आणि सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे उसाचे घटलेले उत्पादन यामुळे हा कार्यक्रम अडचणीत आला होता. यानंतर केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये इथेनॉलला 40 रुपये 85 पैसे प्रतिलिटर (एक्स डिस्टिलरी किंमत) किंमत जाहीर केली.

यंदा जाहीर करण्यात आलेल्या निविदेला साखर कारखाने आणि इथेनॉल निर्माते यांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास आले आहे. या उभयंतांनी 155 कोटी लिटर्स इथेनॉल उपलब्धतेची तयारी दाखविली होती. तथापि, केंद्राने ऑईल कंपन्यांना घातलेल्या डेपोनिहाय मर्यादेमुळे केवळ 113 कोटींचे करार होऊ शकले. या करारामुळे 2017-18 (डिसेंबर ते नोव्हेंबर) या वर्षासाठी साखर कारखानदारीला 4 हजार 500 कोटी रुपये अतिरिक्‍त उपलब्ध होणार आहेत.

या उपलब्धतेमध्ये उत्तर प्रदेशातील निर्माते आघाडीवर आहेत. त्यांनी 44 कोटी 30 लाख लिटर्स इथेनॉल पुरवठ्याची तयारी दाखविली आहे, तर महाराष्ट्रातून 40 कोटी 30 लाख लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचे करार झाले आहेत. पेट्रोलमधील 10 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी 313 कोटी लिटर्स इथेनॉलची आवश्यकता आहे आणि आजघडीला देशातील इथेनॉल निर्मात्यांनी आणखी 42 कोटी लिटर्स इथेनॉल उपलब्धतेची तयारी दर्शविल्याने ऑईल कंपन्यांच्या दुसर्‍या निविदेसाठी निर्मात्यांची प्रतीक्षा सुरू झाली आहे.