Mon, Jan 21, 2019 12:59होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात आढळला मेढशिंगीचा दुर्मीळ वृक्ष

कोल्हापुरात आढळला मेढशिंगीचा दुर्मीळ वृक्ष

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सांधेदुखी, पाठदुखी, वातरोग, गर्भपात अशा विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणार्‍या ‘मेढशिंगी’ हा वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष कोल्हापूर शहरातील पाडळकर कॉलनीत आढळला आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे यांच्या निरीक्षणात कोल्हापुरातील या एकमेव मेढसिंगी वृक्षाची नोंद झाली आहे. 

मेढशिंगी हा वृक्ष मूळचा भारतीय आणि  बिग्नोनियेसी (इळसपेपळरलशरश) कुळातील असून त्याला  संस्कृतमध्ये मेषशृंगी, हिंदीमध्ये मेरशिंगी, कानडीत गुडमुर्की आणि वुडीगे  तर शास्त्रीय भाषेत डोलिकॅन्ड्रॉन फल्क्याटा असं म्हणतात. डोलिकॅन्ड्रॉन म्हणजे लांब, मोठे पुंकेसर असणारा आणि फल्क्याटा म्हणजे विळ्याच्या किंवा खुरप्याच्या आकाराच्या शेंगा येणारा होय. मेढशिंगीचे वृक्ष ओसाड रानात, डोंगर उतारावर, पानगळीची व शुष्क वनं, खडकाळ जमिनीवर आढळतात.

खूप कमी वेगाने वाढणारावृक्ष पानझडी असून 10 ते 20 फुटांपर्यंत वाढतो. विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये याचे मोठे वृक्ष पाहावयास मिळतात. तर कमी पावसाच्या प्रदेशात यांची वाढ असते. याचे खोड बहुधा वेडेवाकडे किंवा सरळ असून त्याचा रंग तपकिरी-चॉकलेटी असतो. साल खरखरीत आणि बर्‍याचदा भेगाळलेली असते. कोवळ्या फांद्या आणि पानांवर लव असते. पाने संयुक्‍त प्रकारची असून त्यात 5 ते 7 पर्णिका असून त्या असमान आणि गोलसर असतात. डिसेंबरमध्ये पानगळती सुरू होते.

मार्चमध्ये नवीन फांद्यांच्या टोकाला 2-5 फुलांचे फुलोरे लागतात. फुल नाजूक, वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आणि सुगंधी असतात. प्रत्येक फुलाची  लांबी 5-7 सेमी आणि व्यास साधारण 3 सेमी असतो. फुलाच्या खालच्या भागात पोपटी रंगाचे निदलपुंज असते. एकमेकांना जोडलेल्या पांढर्‍या शुभ्र कोमल पाकळ्या टोकाकडे विभक्‍त होऊन त्यांची बाहेरील बाजू झालरीसारखी दिसते. मेढशिंगीच्या शेंगा साधारणपणे 30 ते 40 सेमी. लांब  वाढतात. शेंगा परिपक्व होताना मेंढीच्या शिंगांसारख्या वक्र होतात.  

या वृक्षाची नोंद ‘कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोश’ मध्ये  प्रा. एस. आर. यादव आणि डॉ. एम. एम. सरदेसाई यांनी केली आहे. जून महिन्यापर्यंत या वृक्षास फुले येतात. मेढशिंगीची फुले सायंकाळी उमलतात असे डॉ. मकरंद ऐतवडे यांना त्यांच्या निरीक्षणात दिसून आले. मेढशिंगी शोथघ्न, वातहर आणि वेदनाशामक आहे. या वृक्षाची साल व पाने औषधात वापरतात.