Tue, Jun 18, 2019 23:24होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला. धरण क्षेत्रांत दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांनी वाढ झाली असून, पंचगंगा दुसर्‍यांदा पात्राबाहेर पडली.

जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. सर्वदूर असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे. जिल्ह्यातील 27 बंधार्‍यांवर अद्याप पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच आहे. पंचगंगेच्या पातळीत सकाळपासून वाढ होत आहे. सकाळी दहा वाजता पाणी पातळी 27.4 फुटांवर होती. रात्री ती 29.4 फुटांपर्यंत वाढली. रात्री पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 37.81 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. तिथे अनुक्रमे 91 आणि 73.50 मि.मी. इतका पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यात 60 मि.मी., राधानगरीत 56.17 मि.मी., भुदरगडमध्ये 53 मि.मी., आजर्‍यात 37.75 मि.मी., कागलमध्ये 24.35 मि.मी., पन्हाळ्यात 22.43 मि.मी., करवीरमध्ये 14.27 मि.मी.तर कोल्हापूर शहरात 12 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 3 मि.मी. पाऊस झाला.

जिल्ह्यातील आठ धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरी (80 मि.मी.), तुळशी (88 मि.मी.), कुंभी (70 मि.मी.), पाटगाव (170 मि.मी.), जंगमहट्टी (80 मि.मी.), घटप्रभा (160 मि.मी.), जांबरे (103 मि.मी.), तर कोदे परिसरात 147 मि.मी. पाऊस झाला. धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून 1,600 क्युसेक्स, कुंभी धरणातून 160 क्युसेक्स, तर कुंभी धरणातून वीजनिर्मितीसाठी 350 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. घटप्रभा धरणातून 3,793 क्युसेक्स, जांबरे धरणातून 1,249 क्युसेक्स, तर कोदे धरणातून 634 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून सुरू आहे.

सलग पाचव्या दिवशीही वेदगंगा पात्राबाहेरच!

हमीदवाडा : प्रतिनिधी

दमदार पावसाने कागल तालुक्यात वेदगंगा नदीचे पाणी सलग पाचव्या दिवशीही पात्राबाहेरच आहे. त्यामुळे पूरस्थिती कायम आहे. यामुळे पाच दिवसांनंतरदेखील बस्तवडे, नानीबाई चिखली, मळगे व कुरणी हे चारही बंधारे पाण्याखालीच आहेत. त्यामुळे  या परिसरात सध्या फेर्‍याने वाहतूक करावी लागत आहे.दमदार पावसाने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच वेदगंगा पात्राबाहेर वाहू लागली. गेल्या शनिवारी हे चारही बंधारे पाण्याखाली गेले. बानगे व निढोरी पुलावर सध्या वाहतूक सुरू आहे.

घावरेवाडी फाट्याजवळ रस्त्याला पुन्हा भगदाड

कडगाव  (वार्ताहर) : संततधार मुसळधार पावसामुळे भुदरगड तालुक्यातील गारगोटी-शेळोली -वेसर्डे मार्गावरील घावरेवाडी फाट्याजवळ पुन्हा एकदा रस्त्याला मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील एस.टी. व अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या  मार्गावरील घावरेवाडी-मडूरपासून पुढील गावांतील जनतेला कडगावमार्गे  प्रवास करावा लागणार आहे. या मार्गावरील घावरेवाडी-चोपडेेवाडी एस.टी. थांब्याजवळ  सात वर्षांपूर्वी पावसाळ्यात पूर्ण रस्ता, तसेच रस्त्याला लागून असलेला डोंगरसुद्धा मोठ्या प्रमाणात खचला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
पावसाची संततधार कायम राहिल्यास  पावसामुळे येथे रस्त्याला व रस्त्याला लागून वरपर्यंत पुन्हा एकदा  मोठी भेग पडल्यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कासारीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

बाजारभोगाव (वार्ताहर) : कासारी नदीवरील असणार्‍या कासारी मध्यम प्रकल्पामध्ये 54.05 द.श. घ.मी. पाणीसाठा झाला असून, हे  धरण 69 टक्के इतके भरले आहे. तर परिसरातील कुंभवडे, जांभळी नदीवरील पडसाळी, पोंबरे हे लघु प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले असून, या धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कासारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झपाट्याने होत आहे. 
मागील चोवीस तासांत कासारी धरण परिसरात 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कासारी धरणात बुधवारपर्यंत 617.90 मीटरपर्यंत पाणीसाठा झाला आहे.कासारी व जांभळी नदीच्या खोर्‍यात जोरदार पाऊस पडत असल्याने नदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.  बाजारभोगाव येथील पर्जन्यमापन केंद्रात मागील चोवीस तासांत 54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवार हा बाजारभोगावचा आठवडी बाजारचा दिवस होता.  दिवसभर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने याचा परिणाम बाजारावर झाला होता.