Mon, Aug 19, 2019 00:45होमपेज › Kolhapur › ‘इंदिरा’ कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न मार्गी

‘इंदिरा’ कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न मार्गी

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:06PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 3 कोटी 25 लाख रुपयांची पुरवणी मागणी बुधवारी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली. याबाबतची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी इस्पितळ शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये शासनाने हॉस्पिटलचा ताबा घेतला. मात्र, येथील कर्मचार्‍यांचे वेतन रखडले होते. हे वेतन मिळण्यासाठी कर्मचार्‍यांनी दोनवेळा आंदोलन केले. याबाबत आरोग्य मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर वेतन देण्यास मान्यता देण्यात आली. परंतु, अर्थसंकल्पीय तरतूद नसल्यामुळे आरोग्य खात्याने विधिमंडळाकडे पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली. त्यानुसार नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 3 कोटी 25 लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

या इस्पितळाकडे सिटीस्कॅन मशीन उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्येक जिल्ह्याला एकच सिटीस्कॅन मशीन देण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे शासनाने मुंबईतील सिद्धीविनायक गणपती ट्रस्ट व शिर्डी येथील श्री साईबाबा ट्रस्टकडे सिटीस्कॅन मशीनची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिद्धीविनायक ट्रस्टच्या विश्‍वस्तांची भेट घेतली असून लवकरच त्यांच्या माध्यमातून सिटीस्कॅन मशीन उपलब्ध होईल, असेही आ. हाळवणकर यांनी सांगितले. हॉस्पिटलमधील इतर कर्मचारीवर्गाच्या नियुक्‍तीसाठी आलेले अर्ज कोल्हापूर आरोग्य उपसंचालकांनी मंजुरीसाठी शासनाकडे सादर केले आहेत. शासनाकडून मंजुरी मिळताच रुग्णालय कर्मचार्‍यांसह पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असेही आ. हाळवणकर यांनी सांगितले.