हुश्श! मतदान झाले अन् पावसाला सुरुवात

Last Updated: Oct 21 2019 9:12PM
Responsive image

Responsive image

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने 59 टक्के मतदान झाले आहे. गेल्या आठवडाभर राज्यभरात पावसाने थैमान घातले होते. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी मतदाना दिवशीही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, आज दिवसभरात पावसाने उघडीप दिली व मतदान पार पडल्यानंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. 

मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आदी परिसरात, तर पुणे, मराठवाडा आणि राज्यातील उर्वरित काही भागात विजांसह, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, आज (ता.२१) ला पावसाने मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. व रात्री साडेआठच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. 

शनिवार आणि रविवारी दिवसभर पाऊस असल्याने काही मतदान केंद्रावर पाणी साचले होते. तर, काही मतदान केंद्रावर गळती सुरू होती. ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर गळती लागली होती त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, मागील दोन दिवसांच्या पावसाचा अंदाजवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले होते. 

दरम्यान, सायंकाळी ६ वाजता मतदान समाप्त झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झिट पोल सादर केले आहेत. या पोलमधून आलेल्या आकडेवारीमधून राज्यात महायुतीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. एबीपी माझा आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत महायुतीला १९१ ते २१६ जागा दाखवल्या आहेत. महाआघाडीला ५५ ते ८१ जागा दाखवल्या आहेत. इतरांना ४ ते २१ जागा जिंकल्या आहेत. 

टीव्ही नाईन आणि सिसेरो एक्झिट पोलचा अंदाजातही महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपला १२३, शिवसेनेला ७४, काँग्रेसला ४० राष्ट्रवादीला ३५ आणि मनसेला ० जागा दाखवली आहे. इतरांना १६ जागा दाखवल्या आहेत. महायुतीला १९७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महाआघाडीला ७५ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. 

न्यूज १८ लोकमत आणि आयपीएसओएसने  मतदानोत्तर चाचणीतमध्येही महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. महायुतीला २४३ जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. महाआघाडीला ४१ जागा मिळतील असे म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळून आघाडी उर्वरीत राज्यात एकेरी आकड्यांवर समाधान मानावे लागेल असे म्हटले आहे.