Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Kolhapur › आषाढीत एस.टी. कर्मचार्‍यांचा ‘दे धक्का’?

आषाढीत एस.टी. कर्मचार्‍यांचा ‘दे धक्का’?

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

एस.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा करार दोन ते तीनवेळा संप करूनही प्रलंबित ठेवण्यात येत आहे. उलट संप करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याने आता एस.टी. कर्मचार्‍यांनीही महामंडळाला व परिवहनमंत्र्यांना खिंडीत गाठण्याची योजना आखल्याची चर्चा सुरू असून, ऐन पंढरीच्या आषाढी यात्रेतच सरकारला अचानक धक्का देण्याचा विचार संघटनांमध्ये सुरू असल्याची कुजबुज सुरू आहे.  

ऐन आषाढी यात्रेमध्ये पुन्हा अघोषित संप करून सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची तयारी एस.टी. कर्मचार्‍यांनी केली आहे. या अघोषित संपात सर्वच संघटना सहभागी होतील, अशी व्यूहरचना आखण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, ऐन आषाढी वारीत एस.टी. कर्मचार्‍यांनी संप पुकारला, तर महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर होईलच, शिवाय यात्राकाळात एस.टी. बंद असल्याने प्रचंड गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

गेल्यावर्षी दिवाळीपासून एस.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये लालपरीच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. त्यानंतर 8 व 9 जून रोजी एस.टी. कर्मचार्‍यांनी अघोषित संप केला होता. परिवहनमंत्री रावते यांच्या घोषणेनंतर हा संप मागे घेण्यात आला होता; पण कृती समितीच्या वतीने सादर करण्यात आलेला कराराचा प्रस्ताव एस.टी. प्रशासनाच्या वतीने फेटाळण्यात आला आहे. यामुळे कामगारांमध्ये चीड निर्माण होत असून, यासाठी एस.टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या पवित्र्यात असल्याची गुप्त चर्चा सुरू आहे.

घोषित व अघोषित संप केल्यानंतरही कर्मचार्‍यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे आता कर्मचार्‍यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. याचबरोबर काही कर्मचार्‍यांच्या मते, आषाढी यात्रा सोडली, तर यापुढे एस.टी. प्रशासनाला कात्रीत  पकडण्याची संधी मिळणार नाही. यासाठी ऐन आषाढीमध्ये पुन्हा अघोषित संप करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये रंगली आहे. नुकताच करारासंबंधीचा प्रस्ताव एम.डीं.नी नाकारला. कामगारांच्या कृती समितीने सादर केलेला प्रस्ताव नाकारल्यामुळे आणि पगारवाढीचे घोंगडे भिजत ठेवले जात असल्यामुळे कर्मचार्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत कराराबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे, यावर पुढील दिशा ठरविली जाऊ शकते.

पगारवाढीचे घोंगडे भिजत ठेवले

राज्यभरातील एस.टी. कर्मचारी पगारवाढीची मागणी करत संपावर जात आहेत. गेल्यावर्षीपासून वेतनवाढ दिली जाईल, मूळ वेतनात वाढ केली जाईल, महागाई भत्ता वाढविला जाईल, अशी वेळोवेळी आश्‍वासने देऊन राज्य सरकारने वर्षभरापासून एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागणीचे घोंगडे भिजत ठेवले आहे.

आषाढी यात्रेसाठी एस.टी.ची जय्यत तयारी

आषाढी यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पंढरपूर आगारांतून जादा एस.टी. बसेस उपलब्ध केल्या आहेत. एस.टी. कर्मचारी व एस.टी. प्रशासन यामधील धुसफुस कमी झाली नाही. वेतनवाढीचा तोडगा न निघाल्याने एस.टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.