Wed, Aug 21, 2019 02:53होमपेज › Kolhapur › ‘दौलत’चा ताबा 16 रोजी घेणार :  हसन मुश्रीफ 

‘दौलत’चा ताबा 16 रोजी घेणार :  हसन मुश्रीफ 

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 12:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाड्याने घेतलेल्या न्यूट्रियन्स कंपनीशी जिल्हा बँकेने केलेला करार संपुष्टात आल्याने येत्या 16 ऑगस्ट रोजी कंपनीकडून कारखान्याचा ताबा घेतला जाईल. त्यानंतर पुन्हा तातडीने निविदा मागवून हा कारखाना चालवण्यास दिला जाईल, असे आश्‍वासन आज, शुक्रवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. 

हा कारखाना तातडीने दुसर्‍या कंपनीला चालवण्यास द्यावा, कंपनीकडील शेतकर्‍यांची थकीत देणी साखर विक्रीतून द्यावीत, नव्या करारात 2018 पूर्वीची देणीही समाविष्ट करावीत, करार करताना कामगार संघटना प्रतिनिधी व बँक प्रशासन यांची संयुक्त बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली मुश्रीफ यांना देण्यात आले. त्यावेळी मुश्रीफ म्हणाले, हा करार रद्द झाला आहे. संबंधित कंपनीला तसे पत्र दिले आहे, त्यांच्याकडून 16 ऑगस्ट रोजी मालमत्ता ताब्यात घेतली जाईल. शिष्टमंडळात संग्राम कुपेकर, अ‍ॅड. संतोष मळवीकर, सौ. संज्योती मळवीकर आदींचा समावेश होता.