Sat, Apr 20, 2019 08:47होमपेज › Kolhapur › सरपंचांच्या मनमानीविरोधात रांगोळीत सदस्यांचा ठिय्या

सरपंचांच्या मनमानीविरोधात रांगोळीत सदस्यांचा ठिय्या

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:24PMरेंदाळ : वार्ताहर

रांगोळी (ता. हातकणंगले)येथील सरपंचांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ  ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेदिवशी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. ग्रामसभेला झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी, प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशी मागणी करीत आम्हाला विश्‍वासात न घेता कारभार सुरू असल्याच्या निषेधार्थे मासिक सभेवर बहिष्कार टाकला.

वारंवार सूचना देवूनही गावातील बरीच कामे प्रलंबित आहेत. कोणत्याच कामासाठी आम्हाला विश्‍वासात घेतले जात नाही. ग्रामसभेला झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करून कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. काही विकास कामे रखडलेली आहेत. याविषयी चर्चा होऊनही त्यांची पूर्तता होत नाही. या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ मासिक सभेवर बहिष्कार टाकून कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन केल्याचे आण्णा गुंडे यांनी सांगितले. या आंदोलनात यल्लाप्पा कदम, अभिजित कांबळे, सुनील पाटील, संजय कमते, प्रणाली कांबळे, उज्वला पाटील, संगीता पाटील या सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, सरपंच नारायण भोसले म्हणाले, सर्वांना विश्‍वासात घेवूनच कारभार करीत आहे. गावाचा विस्तार मोठा असल्याने कामे वेळेत पूर्ण होणे कठीण आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच विकासकामे मार्गी लागत आहेत. अजूनही काही भागामध्ये कामे प्रलंबित असतील तर त्यावर सर्व सदस्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.