Sun, Jul 21, 2019 14:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शाहू पुरस्कारावरून कुरघोडीचे राजकारण

शाहू पुरस्कारावरून कुरघोडीचे राजकारण

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या छत्रपती राजर्षी शाहू पुरस्कारावरून सत्ताधारी आघाडीतच कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. घटक पक्षांना खूश ठेवण्यासाठी यावर्षी पुरस्काराच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या एका नावाबाबत अद्याप निर्णय झाला नाही. दुसरीकडे जनसुराज्य पक्षानेही एक पुरस्कार मिळावा, असा आग्रह धरल्याचे समजते. शाहू पुरस्कारासाठी 18 सदस्य इच्छुक असून, त्यामध्ये नेत्यांच्या मुलांचाही समावेश आहे.

जिल्हा परिषदेतर्फे चांगले काम करणार्‍या जिल्हा परिषद सदस्य व कर्मचार्‍यांना शाहू जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पंचायत समिती सभापतींसह पाच सदस्यांची व पंधरा कर्मचार्‍यांची निवड केली जाते. सदस्यांच्या निवडीसाठी पदाधिकार्‍यांची समिती आहे. त्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. कर्मचार्‍यांची निवड प्रशासनाच्या वतीने केली जाते. यापूर्वी काँग्रेसची एकहाती सत्ता असायची. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर या दोघांची मिळून सत्ता होती. त्यामुळे पुरस्कार निवडीची फार चर्चा होत नसे. यावेळी भाजपनेही जनसुराज्य शक्‍ती, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी यांच्यासह दोन स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविला आहे. सत्ता स्थापन करताना सर्वांना संधी मिळावी म्हणून पदाधिकार्‍यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल निश्‍चित केला होता. तो संपला तरी त्यावर नेते काही बोलत नसल्याने अगोदरच आघाडीत खदखद सुरू असतानाच आता शाहू पुरस्कार निवडीवरून कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवराज पाटील, सतीश पाटील, जीवन पाटील, आजरा पंचायत समिती सभापती सौ. रचना होलम यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये सतीश पाटील यांचे नाव निश्‍चित होण्याची शक्यता आहे. भाजपकडून सौ. मनीषा टोणपे, गडहिंग्लज पंचायत समिती सभापती सौ. जयश्री तेली यांची नावे चर्चेत आहेत. यात टोणपे अधिक आग्रही आहेत. त्यांनी यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.काँग्रेसकडून माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य बंडा माने, सुभाष सातपुते, राहुल पाटील यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. यामध्ये राहुल पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.

जनसुराज्यकडून शिवाजी मोरे व शाहूवाडी पंचायत समितीचे अमरसिंह खोत शाहू पुरस्कारासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वतीने सौ. वंदना जाधव, कागल पंचायत समितीचे विजय भोसले, पन्हाळा पंचायत समितीचे पांडुरंग खाटकी यांची नावे  चर्चेत होती. सायंकाळी सौ. कोमल मिसाळ यांचे नाव अचानक पुढे आले. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. शाहू विकास आघाडीच्या सौ. स्वरुपाराणी जाधव व आवाडे गटाकडून  राहुल आवाडे यांचे नावही यादीत आहे. कर्मचार्‍यांच्या वतीने 15 जणांची निवड शाहू पुरस्कारासाठी करण्यात येते. या 15 जणांमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी कर्मचार्‍यांनी देखील फिल्डिंग लावली आहे.

पुरस्कारांची संख्या वाढणार?

शाहू पुरस्काराबाबत सदस्यांची नाराजी कमी करण्याकरिता पुरस्कारांची संख्या वाढविण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी घेतल्याचे समजते. या बैठकीत भाजपचे 2 सदस्य, शिवसेना 2 आणि काँग्रेस व राष्ट्रवादी यांना प्रत्येकी 1 असे सहा पुरस्कार देण्यावर चर्चा झाल्याचे कळते. यात जनसुराज्यला स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी आता आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे. सत्तारूढ आघाडीसोबत असणार्‍या स्थानिक आघाड्यांपैकी काही आघाड्यांनी पद नाही, किमान पुरस्कार तरी द्या, अशी मागणी केल्याचे समजते. यातून तोडगा काढण्यासाठी भाजप आपल्या वाट्यातील एक पुरस्कार घटक पक्षांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही.