होमपेज › Kolhapur › जोतिबा डोंगरावर यात्रेसाठी शहर वाहतूक शाखेसह पोलिस यंत्रणा सज्ज

जोतिबा डोंगरावर यात्रेसाठी शहर वाहतूक शाखेसह पोलिस यंत्रणा सज्ज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

जोतिबा चैत्र यात्रेला येणार्‍या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी शहर वाहतूक शाखा गेली महिनाभर परिश्रम घेत आहे. जोतिबा डोंगरावर यात्रा काळात मुख्य दिवशी 1 लाख दुचाकी, तसेच 40 हजारांहून अधिक चारचाकी येण्याचा अंदाज असल्याने तब्बल 21 ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा पोलिस प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. 

जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस 31 मार्च आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक यात्रेला येतात. 29 मार्चपासूनच अनेक भाविक जोतिबा डोंगरावर जमण्यास सुरुवात होते. पारंपरिकरीत्या बैलगाडीतून येणार्‍या भाविकांचीही संख्या मोठी आहे. बैलगाडीतून येणार्‍या भाविकांसाठी गायमुख व यमाई मंदिर परिसरात प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

यात्रेचा मुख्य दिवस 31 मार्च असून, या दिवशी मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर येतात. या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन पार्किंगची ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्राथमिक शाळा, यमाई पायरी, आंब्याचे झाड, एस.टी. स्टँड परिसरात सपाटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ही ठिकाणे प्रथमच पार्किंगसाठी मिळणार आहेत. 

केर्लीकडून जाणार्‍या भाविकांनी यात्रा संपल्यानंतर जोतिबा डोंगर उतरताना यमाई मंदिर, गिरोली घाट, दानेवाडी, वाघबीळ यामार्गे जाण्याचे आहे. वाहतूक नियंत्रणासाठी गेली तीन वर्षे हा एकेरी मार्ग अवलंबला जात असून, याला चांगलेच यश आले आहे. 

वाहतूक थांबणार

यात्रेदिवशी मंदिरातील पालखी सोहळा संपताच भाविक परतीच्या मार्गाला लागतात. यावेळी जोतिबा डोंगरावरून उतरणार्‍यांची संख्या मोठी असते. यामुळे 31 मार्चला सायंकाळी केर्लीकडून जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

...अशी आहे पार्किंग व्यवस्था

दुचाकी पार्किंग : दानेवाडी, नवीन एस.टी. स्टँड, एमटीडीसी परिसर, यमाई मंदिर परिसर. 

चारचाकी पार्किंग : नवीन एस.टी. स्टँड, चव्हाण तळे परिसर, टोल नाक्यासमोरील रिकामे मैदान, जुने एस.टी. स्टँड, दानेवाडी.ट्रक व अवजड वाहने : ग्रामपंचायत परिसर, यमाई पायरी, खण परिसर.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Jyotiba yatra, 


  •