Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Kolhapur › हायटेक चोरट्यासमोर पोलिसही चक्रावले

हायटेक चोरट्यासमोर पोलिसही चक्रावले

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बँकेतील मार्केटिंगची नोकरी सोडून झटपट पैसे कमविण्यासाठी तो घरफोड्या करू लागला. अतिशय थंड डोक्याने, साथीदार न घेतला अत्यंत हायटेक पद्धतीने त्याने 40 हून अधिक घरफोड्या केल्या. हायड्रॉलिक जॅक, रोप क्‍लायबिंगचे साहित्य, ड्रिलमशीन यासह इंटरनेटवरील माहितीच्या आधारे त्याने या घरफोड्या केल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.प्रशांत काशीनाथ करोशी (वय 32, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 70 तोळे सोने, 2 किलो चांदीचा ऐवज, लॅपटॉप, मोबाईल, डीव्हीआर मशीन, कॅमेरे, एलईडी असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. सानेगुरुजी वसाहत, कणेरकरनगर, राजोपाध्येनगर, साळोखेनगर या परिसराला त्याने आपले लक्ष्य केले होते. 

संशयित करोशी एका बँकेत नोकरीला होता. ही नोकरी सोडून तो घरफोड्या करू लागला. घरच्यांना संशय येऊ नये, यासाठी आपण पुण्यात असल्याची खोटी बतावणी केली. स्वत:साठी फुलेवाडी रिंगरोडवर फ्लॅट भाड्याने घेतला. याठिकाणी तो दिवसभर इंटरनेटवरील विविध गोष्टी पाहत होता. बंगल्यात प्रवेश करण्यासाठी रोप क्‍लायबिंग करण्याची प्रात्यक्षिके त्याने इंटरनेटवर पाहिली. याचा उपयोग तो चोरी करताना करू लागला. हायड्रॉलिक जॅकच्या मदतीने खिडकीचे गज वाकविणे सोपे असल्याने त्याने ऑनलाईन खरेदी करून हा जॅक मागविला होता. तसेच अत्याधुनिक ड्रिल मशीन, हत्यारांचे किट, रोप त्याने ऑनलाईन खरेदी केली. 

ऑनलाईन खरेदीमुळे गोत्यात

काही दिवसांपूर्वी बोंद्रेनगरातील चोरीच्या ठिकाणी करोशी हायड्रॉलिक जॅक टाकून पळून गेला होता. या जॅकची अधिक माहिती घेण्याचे काम गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी सुरू केले. शहरातील अनेक दुकानांत फिरूनही त्यांना असा जॅक पाहायला मिळाला नाही. अधिक तपासात हा जॅक ऑनलाईन खरेदी केल्याचे निदर्शनास आले. जॅक कंपनीकडून एका कुरिअर कंपनीकडे आला होता. या कंपनीकडे असा जॅक मागविणारा एकमेव व्यक्‍ती असल्याचे समोर आल्याने पोलिस चोरट्याच्या मागावर होते. मागील तीन महिन्यांपासून पोलिसांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या हायटेक चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.