Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Kolhapur › पादचारी उड्डाण पुलाला मुहूर्त मिळणार कधी?

पादचारी उड्डाण पुलाला मुहूर्त मिळणार कधी?

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी

रेल्वेस्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाच्या निधीला मार्च महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीन महिने होत आले तरी अद्याप त्याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. तातडीने निधी देऊनही महापालिका प्रशासन हे काम गतीने का करत नाही, असा सवाल रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे, दरम्यान पुलाअभावी हजारो प्रवाशी जीव धोक्यात घालून ये-जा करतच आहेत.

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी परिसरात ये-जा करण्यासाठी पादचारी रेल्वे स्थानकावरील फाटकाचा वापर करतात. रेल्वे फाटकातून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत आहेत. मात्र, रेल्वेच्या द‍ृष्टीने ते डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर गाड्यांची ये-जा सुरू असते. यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रेल्वे चालकांतही भीतीचे वातावरण असते. गेल्या दहा वर्षांत या ठिकाणी 34 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर रेल्वेने हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. काही काळ फाटकही बंद करण्यात आले. मात्र, त्याविरोधात आंदोलन करत ते पुन्हा सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले. 

खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी संपर्क करून या पुलासाठी महापालिकेला निधी देण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीद्वारे नगरोत्थान योजनेतून 80 लाख रुपयांचा कमी पडणारा निधी महापालिकेला दिला. निधी उपलब्ध करून देताना त्याला आवश्यक प्रशासकीय मान्यताही दिली. ही मान्यता मिळाल्याने काम सुरू करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला. मात्र, तीन महिने उलटले तरी अद्याप या कामाला मुहूर्त लागलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने बँक खाते देत नसल्याने महापालिकेचा हा निधी अद्याप वर्ग केलेला नाही. वारंवार पाठपुरावा करून महापालिकेने आता बँक खाते क्रमांक दिला आहे, त्यावर लवकरच निधी वर्ग केला जाणार आहे.

दरम्यान, निधी वर्ग झाला नसला तरी निविदा प्रक्रिया राबवून, वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ करता आला असता. मात्र, महापालिकेने अद्याप त्याबाबत कोणतीच हालचाल केलेली नाही. हा पूल तातडीने उभारला पाहिजे, महापालिका हे काम गतीने का करत नाही, असा सवाल रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.