Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Kolhapur › अधिकार्‍यांचे वेतन रोखण्याचे आदेश

अधिकार्‍यांचे वेतन रोखण्याचे आदेश

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:34PMकोल्हापूर : विकास कांबळे

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची माहिती वारंवार सांगूनही किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्याबाबत अधिकार्‍यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्राम विकास विभागाने जोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची शंभर टक्के माहिती वेतन प्रणालीत भरली जात नाही, तोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आले आहे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या किमान वेतनाचा राज्य शासनाचा हिस्सा कर्मचार्‍यांचा बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यपद्धतीही निश्‍चित करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची माहिती किमान वेतन प्रणालीवर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर या कर्मचार्‍यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे आवश्यक आहे. भरलेली माहिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या लॉग-ईनद्वारे गट विकास अधिकारी यांनी प्रमाणित करावयाची आहे. या माहितीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनाची माहिती प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, ग्रामस्वराज्य अभियान यांच्या लॉग-ईनमध्ये प्राप्त होते. यासंदर्भात संबंधितांना स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या तरी देखील जिल्हा परिषदेकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आजअखेर ग्रामपंचायत स्तरावर जवळपास 40 हजार 995 कर्मचार्‍यांची माहिती वेतन प्रणालीत भरण्यात आलेली आहे. तथापि, शासन निर्णयानुसार गट विकास अधिकार्‍यांनी सदरची माहिती प्रमाणित करून राज्यातील केवळ 14 हजार कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन प्रणालीद्वारे आदा करता येईल, इतकीच माहिती लॉगऑनमध्ये प्राप्त झालेली आहे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना त्यांचे किमान वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता तत्काळ कार्यवाही करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. स्मरणपत्रेही पाठविण्यात आली. तरी देखील जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामपंचायत कमर्र्चार्‍यांची माहिती किमान वेतन प्रणालीत भरण्यात आली नसल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या पगारावर त्याचा परिणाम झाला आहे. या कर्मचार्‍यांचे गेल्या सहा महिन्यांतील ऑनलाईन किमान वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा करता आलेले नाही. यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा याबाबतीत सूचना देण्यात आल्या, तरीही अद्याप माहिती भरली जात नाही. त्यामुळे याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांचेच वेतन थांबविण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.