Wed, Apr 24, 2019 01:46होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात वाहनांची संख्या 13 लाखांवर!

जिल्ह्यात वाहनांची संख्या 13 लाखांवर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

आजघडीला जिल्ह्यात 13 लाख 36 हजारांहून अधिक वाहने असून, वाहनांची संख्या विलक्षण वेगाने वाढत आहे. दरमहा तब्बल सात ते आठ हजार नवी वाहने रस्त्यावर धावत आहेत. जिल्ह्यातील एकूण वाहनांच्या संख्येत दुचाकींची संख्या जास्त आहे. त्याच्या खालोखाल कार, ट्रॅक्टर्स आणि ट्रक यांचा क्रमांक लागतो.

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख 76 हजार 1 इतकी होती, ती आज जवळपास 40-42 लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येचा विचार करता, सरासरी प्रत्येक तीन माणसांच्या मागे एक वाहन असे हे प्रमाण आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक ठरते. जिल्ह्यातील वाहनांचे हे प्रमाण दिवसेंदिवस अतिशय वेगाने वाढत चालल्याचे दिसते. जिल्ह्यात दरमहा जवळपास सहा ते सात हजार मोटारसायकलींची भर पडत आहे. याचा अर्थ दररोज 200 ते 235 नवीन मोटारसायकली रस्त्यावर येत आहेत.

चारचाकी वाहनांच्या वाढीचा वेगही काही कमी नाही. दररोज कमीत कमी दोनतरी नवीन कार रस्त्यावर येत आहेत. महिन्याकाठी किमान सहा ते सात लक्झरी गाड्या, पन्‍नास ते साठ रिक्षा, दहा ते बारा बस अथवा मिनी बस, आठ ते दहा स्कूल बसेस, एक-दोन प्रायव्हेट सेक्टर वाहने, किमान एक-दोन अ‍ॅम्ब्युलन्स, एक-दोन बहुवापर वाहने, पन्‍नास ते साठ बहुवापरातील वाहने, तीन ते चार टँकर्स, शंभरावर टेम्पो, तीन-साडेतीनशे ट्रॅक्टर्स आणि तितक्याच ट्रॉल्या इतकी वाहने महिन्याकाठी नव्याने रस्त्यावर येत आहेत. एकूण वाहनांचा विचार करता, दररोज किमान दोनशे ते अडीचशे नवी वाहने रस्त्यावर येताना दिसत आहेत. अन्य जिल्ह्यांत वाहनांच्या वाढीचा हा वेग याच्यापेक्षा कितीतरी कमी आहे.

वाहनांची संख्या विचारात घेता, जिल्ह्याची आर्थिक संपन्‍नता नजरेत भरण्यासारखी आहे. जिल्ह्यातील मोटारसायकलींची संख्या विचारात घेता, जिल्ह्यात साधारणत: 5 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मोटारसायकली आहेत, असे समजण्यास हरकत नाही. जवळपास दहा ते बारा हजार कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान कार्स कोल्हापूरच्या रस्त्यांवरून धावताहेत हे ऐकून कोल्हापूरकरांची छाती आणखी फुगून यायला हरकत नाही. साधारणत:, पाचशे ते सहाशे कोटी रुपयांच्या लक्झरी गाड्या कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू आहेत.

जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपये किमतीच्या रिक्षा कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यांवरून पळताहेत. जवळपास सात हजार कोटी रुपये किमतीचे ट्रक्स कोल्हापूरच्या रस्त्यांवरून धावताहेत. साधारणत:, दीड हजार कोटी रुपये किमतीचे तीनचाकी आणि चारचाकी टेम्पो मालवाहतुकीची जबाबदारी पार पाडत आहेत, असे समजण्यास हरकत नाही. जवळपास चार हजार कोटी रुपये किमतीचे ट्रॅक्टर्स जिल्ह्यातील बळीराजाच्या सेवेत रुजू आहेत आणि त्याच्या साधारणत: निम्म्या किमतीच्या ट्रॉल्यांची त्यांना जोड मिळालेली आहे. तीस हजार कोटी रुपयांहूनही अधिक या वाहनांची एकत्रित किंमत होते. लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांच्या संख्येमागे माणसी जवळपास 75 हजार रुपये वाट्याला येतात.

Tags : Kolhapur, Kolhapur News, number, vehicles, district, 13 lakh


  •