Thu, Nov 15, 2018 09:31होमपेज › Kolhapur › विवाहासंदर्भातील नवा कायदा सर्वसमावेशक 

विवाहासंदर्भातील नवा कायदा सर्वसमावेशक 

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 24 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, तसेच संरक्षण देण्याबाबत राज्य शासन नवीन कायदा तयार करत आहे. हा कायदा सर्वसमावेशक व्हावा, यासाठी लोकांच्या सूचना, मते जाणून घेतली जात असल्याचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थूल यांनी बुधवारी सांगितले. या कायद्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.

थूल म्हणाले, राज्य शासनाने विविध सूचना, तक्रारी, विविध खासदारांनी पाठविलेली पत्रे यांचा साकल्याने विचार करून आंतरजातीय, आंतरधर्मीय विविहासंदर्भात स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सात जणांची समिती स्थापन केली आहे. अशा विवाहांना संरक्षण देणे, या जोडप्यांना हानी पोहोचविणार्‍यांना कठोर शिक्षा करणे, अशा विवाहासंदर्भात समुपदेशन करणे, या जोडप्यांच्या स्वयंरोजगाराला चालना देणे यासाठी विविध उपाययोजना सुचवून सर्वसमावेशक असा हा कायदा व्हावा यासाठी ही समिती प्रयत्नशील आहे.

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांबाबत पोलिसांचे प्रबोधन, महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांचे समुपदेशन आदींबाबत ही समिती या कायद्यामध्ये सूचना करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी 12 जुलै 1919 ला केलेल्या आंतरजातीय विवाहासंदर्भातील कायद्याला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचेही अधोरेखित केले. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, समस्या, तक्रारी, सूचना थूल यांच्यासमोर मांडल्या. 

या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्‍त समाजकल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले, डॉ. मेघा पानसरे, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, राजेश वरक, राजवैभव शोभा रामचंद्र, शाहीर आजाद नायकवडी, राणी पाटील, गीता हासूरकर, बाजीराव नाईक, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे आदी उपस्थित होते.