Wed, Nov 14, 2018 23:02होमपेज › Kolhapur › कामगार, संचालकांतील बोलणी फिस्कटली

कामगार, संचालकांतील बोलणी फिस्कटली

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 1:05AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

थकीत पगाराबरोबरच आपल्या अन्य मागण्यांसाठी हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या 15 मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कारखाना संचालकांनी कामगारांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र संचालक व कामगारांमधील बोलणी फिस्कटली असून कामगारांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. 

दरम्यान, करारात नसलेल्या गोष्टींबाबत सातत्याने पाठपुरावा झाल्यास, कामगारांची देणी दिल्यानंतर अन्य मागण्यांबाबत आडमुठी भूमिका राहिल्यास कंपनीला कारखाना चालविणे शक्य नसल्याचे कंपनीने संचालक मंडळाला सांगितले आहे.चर्चेवेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी कारखान्याच्या कामगारांना विनंती करीत करारामध्ये ज्या बाबी ठरल्या आहेत, त्या देण्याबाबत कंपनीला आम्ही नक्‍की तयार करू. फिटमेंट व अन्य विषयांबाबत  कंपनीने असमर्थता व्यक्‍त केली आहे. कारखान्याची चाके सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी योग्य निर्णय घ्यावा. 31 मेपर्यंतची देणी तातडीने देण्याबाबत कंपनीला सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालक  सतीश  पाटील म्हणाले, सध्या कारखान्याची अवस्था बिकट असून कंपनीलाही या सर्व परिस्थितीत मार्ग काढणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी आ. हसन मुश्रीफांच्या माध्यमातून संचालक मंडळाला कारखाना चालविण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कारखाना सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.याबाबत कामगारांनी सायंकाळपर्यंतची मुदत मागितली होती. यात आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सायंकाळपर्यंत कामगारांनी कोणताही निर्णय दिला नाही. या बैठकीला कारखाना संचालक विद्याधर गुरबे, दीपक जाधव, अमर चव्हाण, सागर हिरेमठ यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.