Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Kolhapur › गुळाला बदनाम करणारे झारीतील शुक्राचार्य शोधण्याची गरज : पटेल     

गुळाला बदनाम करणारे झारीतील शुक्राचार्य शोधण्याची गरज : पटेल     

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गुळाचा दर्जा सुधारला तर गुळाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण, गुळाला बदनाम करणारे झारीतील शुक्राचार्य  शोधण्याची गरज आहे, उत्पादकांनीही गुळात रासायनिक घटक मिसळून तोंडाला काळे फासून घेऊ नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. 

गूळ उत्पादनातील अडीअडचणी व  प्रश्‍न समजावून घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्‍तीची घोषणा पटेल यांनी केली. प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. आर. आर. हसुरे हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील. गूळ उत्पादनातील प्रश्‍न समजून घेण्यासाठी गूळ उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, गुर्‍हाळमालक, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची कृषी महाविद्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस. आर. गडाख होते.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, गुळात साखर जास्त आहे की हायड्रॉस पावडर किंवा अन्य कोणता रासायनिक घटक मिसळला जातो, हे तपासण्यासाठी कोल्हापुरात प्रयोगशाळेची गरज आहे. तसेच कोल्हापुरी गुळाचा ब्रँड तयार होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.  पाशा पटेल म्हणाले,  कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ असतानाही कोहापुरात शुद्ध गूळ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. या उत्पादनाशी संबंधित जे दोष आहेत, ते दुरुस्त करावयाचे आहेत. गुळातील भेसळ तपासण्यासाठी कोल्हापुरात प्रयोगशाळेची गरज आहे. अन्य  पायाभूत सुविधांची गरज आहे. या सर्वांची सोडवणूक करण्यासाठी ही प्राथमिक बैठक घेण्यात आली आहे. 

डॉ. गडाख म्हणाले, गूळ उत्पादनात यांत्रिकीकरण येण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठाने काही साधनांची निर्मिती केली असून, त्याची जनजागृती होणे गरजेचे आहे. फक्‍त गूळ उत्पादनासाठी विद्यापीठाने उसाच्या अनेक जाती विकसित केल्या असून, त्याचाही लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा. चांगल्या आणि दर्जेदार गूळ निर्मितीसाठी आजची बैठक पोषक आहे. रसायनविरहित गुळाला चालना दिली पाहिजे. यावेळी डॉ. हसुरे यांनी गूळ संशोधन केंद्राची माहिती दिली. 

हंगाम सुरू होईपर्यंत प्रश्‍न सोडवू : पटेल

या उपसमितीत अन्य कोणाचा समावेश करावयाचा हे डॉ. गुरव व डॉ. हसुरे ठरवतील. त्यानंतर  महिन्याभरात गूळ उत्पादनातील अडीअडचणी  समजून घेऊन त्याचा अहवाल आयोगाला सादर करतील. त्यानंतर हे प्रश्‍न सोडविण्यासाठी कोल्हापुरात पुन्हा बैठकीचे आयोजन केले जाईल, येणार्‍या हंगामापर्यंत गूळ उत्पादनाशी संबंधीत जास्तीत जास्त प्रश्‍न निकाली काढून हमीभाव ठरविण्यात येईल, अशी ग्वाही पटेल यांनी दिली. 

देशात गुळाचा एकच ब्रॅंड 

गुळाचा देशात एकच ब्रँड देण्याचा विचार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांची सहकार्य करण्याची तयारी आहे. यासाठी गूळ उत्पादनातील असंतोषाचे मूळ शोधण्याची गरज आहे. त्यासाठी ही उपसमिती गांभीर्याने प्रश्‍नांची यादी तयार करेल आणि ते प्रश्‍न सोडवले जातील, असेही  पटेल यांनी सांगितले. 

‘अपेडा’सह कोणत्याही घटकाबरोबर चर्चा करू

गुळाशी संबंधित केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेकडे अनेक योजना आहेत, असे राजाराम पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यावर पाशा पटेल म्हणाले, अपेडाकडे गुळाशी संबंधित अनेक योजना असतील तर त्या योजना सर्वांना समजण्यासाठी कोल्हापुरात या संस्थेची बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले.डॉ. ए.एम. गुरव म्हणाले, कोल्हापुरी गुळापासून 65 प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. मात्र, हा गूळ साखर किंवा हायड्रॉसमिश्रित असू नये. रसायनविरहित गुळापासून चॉकलेट, आईस्क्रिम, गुळाची बर्फी, शोच्या वस्तू, भेटवस्तू तसेच अन्य पदार्थ तयार करता येतात. त्यासाठी सर्वच पातळीवर याचा विचार होणे आवश्यक आहे. गुळाचे आयुर्वेदिक महत्त्व आहे. साखरेऐवजी गुळाचा चहा पिणे हे फायदेशीर ठरत असते. शाहू गूळ संघाचे चेअरमन राजाराम पाटील म्हणाले, गुळाला ग्रेडेशन ठरविण्याची गरज आहे.  

गूळ उत्पादक दादा पाटील, गूळ व्यापारी निमेश वेद, अडते बाळासाहेब मनाडे, कृषी अधीक्षक उमेश पाटील, श्रीकांत घाटगे, आदम मुजावर, बाळासाहेब पाटील यांनी मते मांडली.बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, गूळ उत्पादक रंगराव वरपे, सचिन लोहार यांच्यासह व्यापारी, अडते उपस्थित होते.