Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांसाठी दिल्‍लीवर चाल करून जाण्याची गरज

शेतकर्‍यांसाठी दिल्‍लीवर चाल करून जाण्याची गरज

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या वीस पंचवीस वर्षांत राबवलेल्या आर्थिक धोरणामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर त्यावर आधारीत संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. शेतकर्‍यांचे विश्‍व उद्ध्वस्त होत असताना कार्पोरेट जगताच्या हातात संपत्ती एकवटली गेल्यामुळे  मोठ्या प्रमाणावर असमानता निर्माण झाली आहे. या सर्वांचा उद्रेक नाशिक-मुंबई  लाँगमार्चद्वारे शेतकर्‍यांनी दाखवून दिला आहे. आता याच्या पुढे जात थेट  दिल्‍लीवर दहा लाख शेतकर्‍यांचा मार्च काढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक पी. साईनाथ यांनी केले. संसदेवर चाल करून विशेष अधिवेशन घ्यायला लावून तेथे स्वामिनाथन शिफारशी, कर्जमाफी, महिला, शेतकरी, पाणीपुरवठा याबाबत तीन-तीन दिवस चर्चा करून ठोस धोरण ठरवायला भाग पाडू या, असेही ते म्हणाले.

ते श्री. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय शेती व्यवस्थेचे अरिष्ट’ या विषयावर बोलत होते. कॉ. अजित पाटील, कॉ. प्रकाश जाधव, दिलीप लोखंडे, माजी आमदार संपतबापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 2014 मध्ये सत्तेवर येताना भाजप सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या दुप्पट हमीभावाची आठवण करून देतच पी. साईनाथ यांनी भाषणाची सुरुवात केली. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून अशाप्रकारे हमीभाव दिल्यास मार्केट कोसळेल अशी भीती व्यक्‍त केली; पण या निर्णयामुळे संपूर्ण शेतकरी आणि त्यावर आधारीत व्यवस्थाच भूईसपाट झाली, याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याची टीका साईनाथ यांनी केली. कृषीवर आलेल्या संकटांपैकी आर्थिक असमानतेचे सर्वात मोठे संकट उभे असल्याचे सांगताना साईनाथ यांनी 1991 ला जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील एकही व्यक्‍ती करोडपती नाही; पण 2000 मध्ये 8, 2012 मध्ये 53 आणि 2018 मध्ये तब्बल 121 जण श्रीमंतांच्या यादीत येतात.

श्रीमंतांमध्ये भारत जगाच्या चौथ्या स्थानावर येतो. त्याच वेळी मानव विकास निर्देशांकात तो 131 व्या क्रमाकांवर येतो. देशातील 187 लाख मजुरांनी न थकता वर्षभर काम केले, तरी अंबानींनी 12 महिन्यांत कमावलेली 110 कोटी संपत्ती कमवू शकत नाहीत. शेतकर्‍यांना आतापर्यंत 1989 आणि 2008 अशी दोनच वेळा कर्जमाफी झाली. उद्योजकांना मात्र दरवर्षी कर्जमाफी दिली जाते, अशी खंतही साईनाथ यांनी व्यक्‍त केली.