Tue, Jul 16, 2019 00:04होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय संपत्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज

राष्ट्रीय संपत्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 1:21AMकोल्हापूर : सागर यादव 

प्रेरणादायी प्राचीन वारसाची साक्ष देणार्‍या ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंना ‘राष्ट्रीय  संपत्ती’ असे विशेष महत्त्व आहे. भावी पीढी घडविण्यासाठी अत्यावश्यक असणार्‍या  ऐतिहासिक वस्तूंचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे, या उद्देशाने वस्तू संग्रहालयांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, शासकीय स्तरावर सर्वात दुर्लक्षित विभाग म्हणून पुरातत्त्व, पुराभिलेख आणि वस्तू संग्रहालयांकडे पाहिले जाते. 

अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या विभागांना शासनांच्या विविध योजनांचे कोंदण गरजेचे आहे. मात्र, कार्यायलीन खर्च वगळता प्रत्येक योजनेसाठी आवश्यक निधीच्या प्रस्तावाची कागदे रंगवून ती सरकारी लालफितीत मंजुरीसाठी वर्षानुवर्षे ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे वास्तव आहे. कार्यालयीन खर्च वगळता कोणताही विशेष निधी या विभागांना मिळत नाही. कार्यालयीन खर्चाचीही वेळोवेळी मागणी करावी लागते. कोणत्याही प्रकारचा नियमित निधी या विभागांना दिला जात नाही. खरेतर जगभरातील इतर राष्ट्रांप्रमाणे अनमोल ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी कायमस्वरुपी किंवा नियमीत निधीची तरतूद नसते. ती व्हावी, अशी मागणी सातत्याने इतिहासप्रेमींतून होत असते.   

‘शाहू नगरी’ कोल्हापूरला लाभलेल्या प्राचीन ऐतिहासिक वारसाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने कोल्हापूर वस्तू संग्रहालय, न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी म्युझियम, कसबा बावडा लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहू जन्मस्थळ  व संग्रहालय, राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कला दालन आणि कणेरी येथील सिद्धगिरी संग्रहालय अशा वस्तू संग्रहालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आज 18 मे जागतिक वस्तू संग्रहालयदिन यानिमित्त या वस्तू संग्रहालयांबद्दल थोडे...

कोल्हापूर वस्तू संग्रहालय (टाऊन हॉल  म्युझियम) : 30 जानेवारी 1946  कोल्हापूर  वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली.  1949 मध्ये टाऊन हॉल उद्यानातील ‘कोल्हापूर नगर मंदीर’  येथे हे वस्तू संग्रहालय नेण्यात आले. ही वास्तू  सन 1872 ते 76 या कालावधीत रॉयल इंजिनिअर सी मॉट यांच्या देखरेखेखाली गॉथीक वास्तूशास्त्रानुसार बांधण्यात आली. 2009 मध्ये पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालय शास्त्रानुसार नव्या 7 दालनांची मांडणी करण्यात आली. यात इ.स. 200 पासूनच्या वस्तूंचा समावेश आहे. अलीकडेच या संग्रहालयाचा अंतर्गत आणि परिसर विकास करण्यात आला आहे. मात्र या संग्रहालयाचा प्रचार व प्रसार व्हावा तितका न झाल्याने त्याला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येला मर्यादा आहे. 

‘शाहू’ जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस)  : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त 1974 साली या वास्तूला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. 3 मार्च 1977 पासून राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत या वास्तूचा समावेश झाला. या वास्तूत राजर्षी शाहूंच्या कार्याचा आढावा घेणार्‍या वस्तूंचा समावेश आहे. शाहू जन्मस्थळाच्या विकासाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. खुद्द ‘शाहूनगरी’ कोल्हापुरातच शाहू महाराजांच्या इतिहासाच्या जतना संदर्भातील अनस्थेबाबत लोकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.  

न्यू पॅलेस म्यूझियम  : छत्रपती शहाजी महाराजांनी नव्या राजवाड्यात शहाजी छत्रपती म्युझियमची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त 30 जून 1974 रोजी हर हायनेस सौ. प्रमिलाराजे छत्रपती महाराणीसाहेब यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उदघाटन झाले. व्यवस्थापनासाठी शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टची स्थापना करण्यात आली. नव्या राजवाड्यातील संग्रहालय 12 दालनात विभागले आहे. खासगी संग्रहालय असल्याने याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे.   

शिव सांस्कृतिक मंडळाचे संग्रहालय : पन्हागडावरील शिव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 1985 च्या सुमारास या छोटेखानी वस्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ इतिहास संशोधक मु.गो. गुळवणी व जी. डी. पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी  या संग्रहालयाची उभारणी केली. 2000 सालापर्यंत हे संग्रहालय सुरू होते. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या हे संग्रहालय बंद आहे.
चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. चंक्रांत मांडरे यांच्या निसर्ग चित्राच्या आवडीतून निर्माण झालेले हे संग्रहालय. स्वत:काढलेली व जमविलेल्या शेकडो चित्रांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने मांडरे यांनी राजारामपुरी येथील आपले राहते घर चित्रसंग्रहासाठी शासनाला दिले. पुरातत्त्व विभाग व वस्तू संग्रहालय विभागाने या ठिकाणी चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय सुरू केले. 10 मार्च 1987 रोजी याचे उदघाटन झाले. छायाचित्र दालन, पावडर शेडींग, दालन, चित्रकला दालन 1 व 2 अशा चार विभागात संग्रहायल विभागले आहे. मात्र, याचा प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने होत नसल्याने हे दुर्लक्षित आहे.

टाऊन हॉल व मांडरे कलादालनात आज मोफत प्रवेश... 

राष्ट्राची संपत्ती असणार्‍या आपल्या प्राचीन वारसा आणि ठेव्याबद्दल लोकांना माहिती व्हावी, त्याबाबत जनजागृती होऊन ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाबाबत त्यांनी सजग व्हावे या उद्देशाने जागतिक संग्रहालयदिन सर्वत्र 18 मे रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाअंतर्गत असणार्‍या कोल्हापूर वस्तू संग्रहालय (टाऊन हॉल म्युझियम) मध्येही हा दिवस प्रतिवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत शुक्रवार 18 मे रोजी सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 यावेळेत टाऊन हॉल म्युझियम आणि चंद्रकांत मांडरे कलादालन लोकांसाठी मोफत खुले ठेवण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन वस्तू संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी केले आहे.