Mon, May 25, 2020 21:56होमपेज › Kolhapur › लाभार्थीत आमदार आबिटकरांचे नाव ही जिल्हा बँकेची चूक

लाभार्थीत आमदार आबिटकरांचे नाव ही जिल्हा बँकेची चूक

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 9:10AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

प्रकाश आबिटकर यांनी कर्जमाफीसाठी कोणताही अर्ज केला नाही. प्रकाश सुतार यांना 25 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले असताना प्रकाश आबिटकर यांचा खाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने पाठविल्याने आबिटकर यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आले, असा खुलासा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला. तसेच आबिटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचेही सांगितले. मात्र, या प्रकरणाची चर्चा दिवसभर विधानभवन परिसरात होती.

पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळत नसल्याच्या कारणास्तव विधिमंडळात घमासान सुरू असतानाच शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे कर्जमाफीचे लाभार्थी ठरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आमदारांना कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. निकषानुसार खासदार, आमदारांसह त्यांच्या नातेवाईकांना कर्जमाफी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आबिटकर यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आल्याने त्याचे पडसाद दिवसभर अधिवेशनात उमटले.

आबिटकर यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 25 हजारांची कर्जमाफी देण्यात आल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले आहे. यादीत अनेक शिक्षकांसह आमदार आबिटकर यांचेही नाव आल्याने त्यांनी हा प्रकार विधानसभेत आयत्या वेळच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करून निदर्शनास आणून दिला. कर्जमाफी पात्र लाभार्थ्यांपर्यंत खरोखरच पोहोचली का, याचे हे ढळढळीत उदाहरण असून, एखाद्या आमदाराचे अशा यादीत नाव येणे ही गंभीर बाब असल्याचे आ. आबिटकर म्हणाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम हे चुकीच्या पद्धतीने चालले असल्याचे हे उदाहरण असून, असा प्रकार पात्र शेतकर्‍यावर अन्याय करणारा असल्याचेही आ. आबिटकर यांनी सांगितले.

या प्रकरणाची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करतानाच ही चूक कोल्हापूर जिल्हा बँकेमुळे घडल्याचे सांगितले. ते म्हणाले, आ. प्रकाश आबिटकर यांचा कर्जमाफीसाठी अर्ज नाही. आबिटकर या आडनावाचे एकूण 37 अर्ज आहेत. तसेच प्रकाश आबिटकर या नावाने सुद्धा एक अर्ज आहे; पण तो आमदार आबिटकर यांचा नाही.

चूक झाली ते प्रकरण कोल्हापूर जिल्हा बँकेशी संबंधित आहे. अर्ज नसतानाही कोल्हापूर जिल्हा बँकेने आबिटकर यांचे खाते या योजनेच्या लाभासाठी सरकारकडे पाठविले होते. एक अर्ज प्रकाश सुतार यांचा आहे. या व्यक्तीचा अर्ज, आधार क्रमांक, जन्मतारीख, बचत खाते, बँक आयएफएससी कोड अशा निकषांवर तपासण्यात आला. मात्र, कुठलेच रेकार्ड मॅच होत नसल्याने कर्जखाते तपासण्यात आले. त्यानंतर प्रकाश आबिटकर आणि प्रकाश सुतार या दोघांचाही एकच कर्जखाते क्रमांक कोल्हापूर जिल्हा बँकेने दिला. त्यामुळे आ. प्रकाश आबिटकर यांचे नाव यादीत आले. ही दोन्ही खाती 18 महिन्यांचे पीककर्ज घेतलेली खाती आहेत आणि दोघांनीही पूर्ण कर्ज परत केले आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. ही चूक दुरुस्त करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा बँकेला देण्यात येतील, असेही ते म्हणाले.