Fri, May 24, 2019 02:45होमपेज › Kolhapur › मित्राचा दगडाने ठेचून खून

मित्राचा दगडाने ठेचून खून

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:46AMइचलकरंजी : वार्ताहर

दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे दोघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला. विजय जनार्दन सरदेसाई (वय 27, रा. स्वामी मळा) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कबनूर परिसरातील फरांडे मळा परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रज्जाक इमाम शेख व इस्माईल आयुब शेख (दोघे. रा. साईनाथनगर) या दोघांना अटक केली.

स्वामी मळा परिसरात राहणारा विजय ऑटोलूमवर ड्रॉपिंग करण्याचे काम करीत होता. विजयचे रज्जाक व इस्माईल हे दोघे मित्र होते. या तिघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या पैशावरून तसेच आर्थिक देवघेवीतून त्यांच्यात नेहमीच वादावादी होत असे. महिन्याभरापूर्वी याच कारणातून वाद झाला होता. त्यातच रज्जाक याने विजयकडे दारूसाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, विजयने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे विजयचा भाऊ आणि रज्जाक यांच्यात मोठा वाद झाला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.
दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याचा राग रज्जाक व इस्माईल यांच्या मनात कायम होता. शनिवारी रात्री दोघेही विजयच्या घरात गेले. त्या ठिकाणी विजय न आढळल्यामुळे त्यांनी विजयची आई शोभा यांच्याकडे विचारणा करीत विजयला शिवीगाळ करून त्याला सोडत नाही, असे धमकी दिली.

रात्री नऊच्या सुमारास त्यांची भेट झाली. त्यानंतर जवाहरनगर परिसरातील एका देशी दारू दुकानात त्यांनी मद्यप्राशन केले. तेथे रज्जाक याने बाबू नामक मित्राची दुचाकी घेतली व तिघेही फरांडे मळा परिसरात आले. यावेळी पुन्हा त्यांची वादावादी झाली. चिडून इस्माईल याने विजयचे दोन्ही हात धरले, तर रज्जाकने त्याचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य न झाल्यामुळे रज्जाकने त्याच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. पुन्हा दोघांनीही दगडाने त्याला ठेचले. वर्मी घाव बसल्याने विजयचा जागीच मृत्यू झाला. दगडाने ठेचल्यामुळे विजयचा चेहरा छिनविछिन्न झाला होता.

खुनाची माहिती मिळताच शिवाजीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, प्रज्ञा चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. विजयच्या आईकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. आयजीएममध्ये शवविच्छेदन करून विजयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विजय अविवाहित होता. त्याच्या पश्‍चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आदींनी माहिती घेऊन सूचना केल्या. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या विविध चार पथकांद्वारे तपास करीत संशयितांना गजाआड करण्यात आले. घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला व रक्ताने माखलेला दगड पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळासह आयजीएम इस्पितळ तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.