Wed, Jun 26, 2019 12:00होमपेज › Kolhapur › डेंग्यूविरुद्ध महापालिका यंत्रणा लागली कामाला

डेंग्यूविरुद्ध महापालिका यंत्रणा लागली कामाला

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत मंगळवारी नगरसेवकांनी प्रचंड गदारोळ घातल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. निम्म्या शहराला डेंग्यूने विळखा घातल्यानंतर बुधवारी महापालिकेची यंत्रणा झाडून कामाला लागली. तीन हजारांवर घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह 300 हून जास्त अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले. डेंग्यूची लागण झालेल्या भागात सर्व्हे करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणीसह योग्य त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या.

महापालिकेच्या वतीने 20 ते 26 जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी त्यासाठी अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर, उपायुक्‍त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. डी. ए. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील या अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. या अधिकार्‍यांनी दररोज डेंग्यू सर्व्हेलन्स कामकाजाच्या निमित्ताने असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवून तपासणी करावी, असे आदेशही आयुक्‍तांनी दिले आहेत. 

सदर बाजार, मंगेशकरनगर, चिले कॉलनी, फिरंगाई, लक्षतीर्थ वसाहत, साळोखेनगर, दुधाळी इत्यादी परिसरामध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाचे 226 कर्मचारी, पवडी विभागाचे 46, दवाखान्यांकडील कर्मचारी 31 इत्यादींचा समावेश होता. मोहिमेंतर्गत 3 हजार 20 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यापैकी 345 कुटुंबांमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची आळी अढळून आलेली असल्याने ते पाणी फेकून देण्यात आलेले आहे. तसेच 19 ठिकाणची पाण्याची डबकी मुजविण्यात आलेली आहेत. 21 ठिकाणांवरील खरमाती उठाव करण्यात आलेली आहे. 

अतिरिक्‍त आयुक्‍त पाटणकर, उपआयुक्‍त शिंदे, आरोग्याधिकारी पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक पाटील यांच्या समन्वयाने राबविण्यात आली. महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी दुधाळी, गंगावेस व फिरंगाई परिसरात व आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत या ठिकाणी मोहिमेच्या कामाची पाहणी करून कर्मचारी व अधिकारी यांना सूचना दिल्या. दरम्यान, शहाजी वसाहत येथील उद्यानाजवळ महापौर सौ. शोभा बोंद्रे व आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी हे गुरुवारी सकाळी फिरती करणार आहेत.