Mon, Sep 24, 2018 07:11होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत एल्गार

मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत एल्गार

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:27AMइचलकरंजी : वार्ताहर

मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांनी पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीने परिसर दणाणून सोडला. तासाभराच्या आंदोलनानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आंदोलक प्रांत कार्यालयावर धडकले. त्या ठिकाणीही जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिष्टमंडळाने समीर शिंगटे यांना निवेदन सादर केले. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्यापही न झाल्याने मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दुसर्‍या पर्वाला आजपासून सुरुवात झाली. आज इचलकरंजीतही आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला. शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने शहरात चक्‍काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून समाज बांधवांकडून गतीने प्रयत्न सुरू होते. 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच समाजबांधव गटागटाने, भागाभागात रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमत होते. 11 वा.च्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती होऊन आंदोलनाला प्रारंभ झाला.  तासाभराच्या आंदोलनानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. कॉ. मलाबादे चौक, बंगला रोडमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्या ठिकाणी प्रांताधिकारी शिंगटे यांना निवेदन सादर करण्यात आले.