Fri, Jul 19, 2019 05:45होमपेज › Kolhapur › बेपत्ता पोलिसामुळे तारांबळ!

बेपत्ता पोलिसामुळे तारांबळ!

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:55AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पन्हाळ्यात सेवा बजावणारा पोलिस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने नातेवाइकांसह पोलिसांची तारांबळ उडाली. त्याचा मोबाईल बंद असल्याने शहरातील सीसीटीव्ही फुटेजवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो पापाची तिकटी येथे दोन दिवसांपूवीर्र् आला होता, असे दिसून आला. शोधकार्यात गुंतलेल्या पोलिसांना तो सांगलीत असल्याची माहिती मिळताच त्याला तिथून आणण्यात आले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. 

करवीर तालुक्यात शहरालगत हा पोलिस राहण्यास आहे. सध्या पन्हाळा तालुक्यातील पोलिस ठाण्यात सेवा बजावत आहे. दोन दिवसांपासून तो घरातून निघून गेला. तो घरी न आल्याने नातेवाइकांनी रविवारी याची माहिती पोलिस ठाण्यात दिली. याची दखल घेत पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी तो पापाची तिकटी परिसरात आल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून सोमवारी त्याचा दिवसभर शोध सुरू होता. 

दुपारी तो सांगली फाटा येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा माग काढत पोलिस सांगलीपर्यंत पोहोचले. याठिकाणी तो पोलिसांना मिळून आला. याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळविण्यात आली. सायंकाळी पोलिस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. 

नेमके कारण काय?

पोलिस कर्मचार्‍याच्या या कृतीमागे नेमके काय कारण होते याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कामाच्या ताणामुळे त्याने असे केले की कौटुंबिक कारणातून याचा शोध पोलिस घेत आहेत.