Mon, Jun 17, 2019 14:23होमपेज › Kolhapur › पुजारी नियुक्‍तीबाबत लवकरच बैठक

पुजारी नियुक्‍तीबाबत लवकरच बैठक

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पुजारी हटाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले.

पुजारी नियुक्‍तीसाठी परीक्षा, मुलाखत घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असता, काहींनी न्यायालयात जाऊन अडथळे आणले गेले, त्यावेळी पुजारी हटाव समिती कोठे गेली होती, असा सवाल  जाधव यांनी पुजारी हटाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांसमोर बोलताना उपस्थित केला. परीक्षा घेण्याचे प्रकरण न्यायालयात गेले नसते, तर पुजारी नियुक्‍त करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला असता, असेही जाधव यांनी सांगितले. 

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा झाला आहे. कायदा होऊन चार ते पाच महिने झाले. तरीही नवीन पुजारी मंदिरात आले नाहीत, गणेशोत्सव, त्यानंतर दसरा झाल्यानंतर पुजारी नेमण्यात येणार आहेत, अशी बाहेर चर्चा सुरू आहे. तेव्हा पुजारी नेमण्याबाबत पुढील कार्यवाही काय झाली, यासंदर्भात पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने रविवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली.  

जाधव म्हणाले, श्री अंबाबई मंदिरात पगारी पुजारी नियुक्‍ती कायदा झाला आहे. कायदा झाल्यानंतर मुंबईत विधी व न्याय खात्यातील अधिकार्‍यांसमवेत चार बैठका झाल्या; पण जोपर्यंत अंतिम आदेश निघत नाही, तोपर्यंत पुजारी भरतीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. तरीही कायदा मंजूर झाल्याने किती पुजारी लागणार, याचा अभ्यास समितीने केला. त्यावेळी तीन शिफ्टमध्ये 55 ते 60 पुजारी नेमावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुजारी भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यानुसार 112 लोकांनी अर्ज केले होते. त्यातील 107 जण मुलाखत व परीक्षेला उपस्थित होते. ही परीक्षा शिवाजी विद्यापीठात घेण्यात येत होती; पण अशी परीक्षा घेण्याचे देवस्थान समितीला अधिकार आहेत का, असेलच तर ते कोणी दिले आणि विद्यापीठातच मुलाखती घेण्याचे कारण काय, असे प्रश्‍न उपस्थित करून दिलीप देसाई, सुरेश पोवार हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार नसाल, तर प्रक्रिया थांबवा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे भरतीची प्रक्रिया थांबली आहे. त्यावेळी कृती समिती कोठे होती.

ही प्रक्रिया थांबली नसती, तर 60 पुजार्‍यांची नियुक्‍ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने 10 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पात्र पुजार्‍यांकडून अर्ज मागवून त्यांची परीक्षा व मुलाखात घेऊन त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावयाचा म्हणून प्रक्रिया सुरू केली होती. 

जाधव म्हणाले, कायदा झाल्यामुळे पगारी पुजारी नेमावेच लागतील, त्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊ, असे सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, पगारी पुजारी नियुक्‍तीबाबत कायदा झाला आहे, त्यामुळे थांबून चालणार नाही; अन्यथा संशयाला जागा निर्माण होईल; पण ते खपवून घेतले जाणार नाही. शरद तांबट यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

पुजारी नियुक्‍तीसाठी मुलाखत व परीक्षा घेण्यात येत असताना न्यायालयात जाऊन या प्रक्रियेत अडथळा आणणार्‍यांचा या बैठकीत निषेध व्यक्‍त करत आहोत, असे बाबा पार्टे म्हणाले. यावेळी आर. के. पोवार, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, सुरेश साळोखे, वसंतराव मुळीक, चारुलता चव्हाण आदी उपस्थित होते.