Thu, Jul 18, 2019 21:26होमपेज › Kolhapur › तब्बल 41 हजार अर्ज विसंगत

तब्बल 41 हजार अर्ज विसंगत

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 24 2018 11:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या कर्जमाफीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शासनाकडे पाठवलेल्या 41 हजार अर्जांमधील माहिती विसंगत आहे. त्यामुळे या अर्जांची पडताळणी करून यातील पात्र व अपात्र ठरवा, अशी सूचना करत शासनाने सहकार विभागाकडे याद्या पाठविल्या आहेत. त्या अर्जांची पडताळणी जिल्हा बँक, सहकार खात्यातील अधिकारी व संबंधित संस्था यांच्याकडून सुरू आहे. मंगळवारपर्यंत पडताळणीचे काम पूर्ण करून पात्र व अपात्र शेतकर्‍यांची यादी शासनाला पाठविण्यात येणार आहे.

कर्जमाफीसाठी मागविण्यात आलेले अर्ज व तयार करण्यात आलेली यादी याचा घोळ अजूनही मिटलेला नाही. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून 2 लाख 71 हजार शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. यातील जिल्हा बँकेंतर्गत 1 लाख 67 हजार खातेदारांना सुमारे 300 कोटी, तर इतर बँकांच्या खातेदारांना 49 कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. शासन टप्प्याटप्प्याने पात्र शेतकर्‍यांच्या याद्या जिल्हा बँकेकडे पाठवत असते. गेल्या महिनाभर पात्र शेतकर्‍यांच्या याद्या बँकेकडे आल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना पैसे मिळण्यासाठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर बुधवारी राज्यातील 8 लाख 44 हजार खातेदारांच्या अर्जांत विसंगत माहिती असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर विसंगत याद्याचे जिल्हा बँक व सहकार विभागाकडे पडताळणीचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांत शासनाकडून सुमारे 41 हजार खातेदारांच्या अर्जांत विसंगत माहिती असल्याचे आढळून आल्याने ते अर्ज फेरपडताळणीसाठी पाठविले आहेत. 

फेरपडताळणीमध्ये त्या अर्जांत भरलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती याची पडताळणी करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखानिहाय पडताळणीचे काम सुरू आहे. पडताळणी झाल्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून या यादीची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी पुन्हा आय.टी. विभागाकडे पाठविली जाणार आहे. यानंतर तालुकास्तरीय कमिटी पात्र अर्ज किती आणि अपात्र अर्ज किती, हे स्पष्ट करून त्याची माहिती शासनाकडे पाठवणार  आहे. मंगळवारपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगितले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, The list, farmers, sent, the government.