Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Kolhapur › कर्जमाफी लाभार्थी शेतकर्‍यांची यादी झळकणार

कर्जमाफी लाभार्थी शेतकर्‍यांची यादी झळकणार

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:05AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफीत लाभार्थी शेतकर्‍यांची माहिती आपले सरकार पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या या सूचनेनंतर गुरुवारी दिवसभर या याद्या अपलोड करण्याचे काम जिल्हा बँकेत सुरू होते. 

आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफी मिळाल्याने एकच गोंधळ झाला. त्यामुळे शासनाने 78 हजार 932 शेतकर्‍यांची ग्रीन यादी रद्द केली आहे. नवीन यादीची प्रतीक्षा असतानाच आता जुन्या यादीतील लाभार्थ्यांची नावे अपलोड करण्याच्या सूचना आल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. 

जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज केले आहेत. या खातेदारांची 4 लाख 50 हजार खाती आहेत. यापूर्वी 15982 थकबाकीदारांना 63 कोटी 68 लाख तर नियमित कर्ज परतफेड करणार्‍या 67 हजार 582 कर्जखात्यांना 109 कोटी 64  लाख रुपये असे 83 हजार 510 खातेदारांना 173 कोटी 32 लाख 64 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यानंतर पुन्हा 78 हजार 932 कर्जदारांची ग्रीन लिस्ट आली होती.

या यादीची छाननी केली असता त्यात आ. आबिटकर यांचाही कर्जमाफीस समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याने अधिवेशनात गोंधळ झाला. त्यामुळे शासनाने ही यादीच थांबवली आहे.  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानापोटी किमान 550 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.