Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › वडिलोपार्जित संपत्तीत हिंदू मुलीचा कायदेशीर समान व अबाधित हक्‍क

वडिलोपार्जित संपत्तीत हिंदू मुलीचा कायदेशीर समान व अबाधित हक्‍क

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिंदू मुलीचा कायदेशीर समान आणि अबाधित हक्‍क आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी आज येथे केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने शाहू स्मारक भवन येथे आयेाजित अ‍ॅड. अरविंद च. शहा स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना न्यायमूर्ती ललित बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘हिंदू महिलेचा सहहिस्सेदार म्हणून वडिलोपार्जित संपत्तीत असणारा हक्‍क व त्याची सध्याची कायदेशीर परिस्थिती’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.

कायद्याचा विद्यार्थी म्हणून वाटते की, हिंदू स्त्रीसुद्धा मग कर्ता का होऊ शकत नाही? दिल्‍ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात स्पष्ट केले आहे की, मोठी मुलगीसुद्धा हिंदू कुटुंबाची कर्ता होऊ शकते. आपण ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा देत आहोत. त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्‍कापासून वंचित ठेवू नका.

याप्रसंगी न्यायमूर्ती उदय ललित यांनी अ‍ॅड. अरविंद शहा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अ‍ॅड. अरविंद शहा हे तल्‍लख बुद्धिमत्ता व अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व होते. वकिलीचे निष्णात काम हे त्यांचे वैशिष्ट्य होते, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील म्हणाले, अ‍ॅड. अरविंद शहा हे एक सहृदयी, मानवतावादी व अभ्यासू वकील होते.   पश्‍चिम महाराष्ट्रात उलट तपासात ते निष्णात होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर म्हणाले, अ‍ॅड. अरविंद शहा यांनी वकिली क्षेत्रात केलेले काम, त्यांचे युक्‍तिवाद आजच्या वकिलांना आदर्शवत आहेत.

अ‍ॅड. संतोष शहा यांनी प्रास्ताविकात अ‍ॅड. अरविंद च. शहा स्मृती व्याख्यानमाला आयोजनाचा उद्देश विषद केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेश्‍चंद्र मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी अ‍ॅड. अरविंद शहा यांच्या कार्याचा आढावा घेऊन गौरव केला. अ‍ॅड. विल्सन नाथन व नताशा मार्टिन यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. ओंकार देशपांडे यांनी आभार मानले. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा न्यायालयातील अनेक मान्यवर न्यायाधीश, सरकारी वकील, जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील वकील, विविध लॉ कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.