होमपेज › Kolhapur › सर्वात मोठे आज चंद्रग्रहण

सर्वात मोठे आज चंद्रग्रहण

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी (दि.27) दिसणार आहे.  आशिया, आस्ट्रेलिया, युरोप आणि साऊथ अमेरिकेमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा काळ हा सर्वात मोठा म्हणजे 103 मिनिटांचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीची सावली चंद्रावर103 मिनिटे राहील. कोल्हापूरमध्ये रात्री 10 वाजून 46 मिनिटे 36 सेकंदांनी ग्रहणाची सुरुवात होईल. हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी विवेकानंद कॉलेज, चित्रदुर्ग मठ आणि शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स विभागात दुर्बिणीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. 

चंद्र हा रात्री 1 वाजून 15 सेकंद ते  2 वाजून 44 मिनिटे 12 सेकंदांपर्यंत पृथ्वीच्या सावलीखाली असणार आहे. या ग्रहणाला मायक्रोमून असे म्हणतात. कारण, या कालावधीत चंद्र हा पृथ्वीपासून नेहमीपेक्षा जास्त लांब अंतरावर म्हणजेच 4 लाख 1 हजार 814 किलोमीटर एवढ्या अंतरावर असणार आहे. तसेच चंद्र हा नेहमीपेक्षा आकाराने लहान दिसणार आहे. पृथ्वीच्या सावलीमध्ये चंद्र पूर्णपणे झाकोळला जाईल तेव्हा त्याला ब्लडमून असे म्हणतात. कारण, या काळात त्याचा रंग हा लाल रक्‍तासारखा असतो. या ग्रहणाची अखेर पहाटे 4 वाजून 59 मिनिटे व 57 सेकंदांनी होणार आहे. ही खगोलशास्त्रीय घटना असल्याने खगोलप्रेमींना आनंदाची पर्वणी असल्याची माहिती  प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. दरम्यान, सध्या पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे ग्रहण सहजासहजी दिसण्यात अडचणी निर्माण होतील, असे दिसते. पण, विवेकानंद कॉलेजमध्ये यावर उपाय म्हणून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणातही खगोलप्रेमींना ग्रहण दिसू शकणार आहे.