Sun, May 26, 2019 00:39होमपेज › Kolhapur › पोलिस अधीक्षकांना पेलावे  लागणार आव्हानांचे शिवधनुष्य 

पोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आव्हानांचे शिवधनुष्य 

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 12:44AMकोल्हापूर : दिलीप भिसे

नक्षलग्रस्त जिल्ह्यात ‘आर या पार’ मुकाबला करताना मुँहतोड जवाब देत सहकार्‍यांच्या मदतीने 74 नक्षलवाद्यांचा खात्मा करून शंभरावर नक्षल्यांना बेड्या ठोकून गडचिरोलीत पोलिसांचा दबदबा वाढविलेले डॉ. अभिनव देशमुख कोल्हापूरचे 33 वे पोलिस अधीक्षक म्हणून लवकरच पदभार स्वीकारत आहेत. संवेदनशील, जागरूक, पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या आणि क्रियाशील जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेऊन संघटित गुन्हेगारीवर वचक ठेवताना सामान्यांच्या हक्क व रक्षणाच्या जबाबदारीचे शिवधनुष्य नव्या पोलिस अधीक्षकांना पेलावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस दलाला लैकिक आणि वैभवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोल्हापूर पोलिस दलाने कार्यकतृत्वाच्या जोरावर सातासमुद्रापार झेंडा फडकाविला आहे. मुंबई पोलिस दलाच्या क्रॉईम ब्रँचशी कोल्हापूर पोलिस दलाची तुलना केली जात असे. आजही त्याच सामर्थ्याने समाजकंटकांवर वचक ठेवून सामान्यांना न्याय देण्याचा कोल्हापूर पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो.

पोलिस दलाची ख्याती जोपासली !
1 मार्च 1949 ते जुलै 2018 काळात कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पद भूषविलेल्या अनेक अधिकार्‍यांनी राज्यभरात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. एफ. डी. रोश, इ. एस. मोडक, सी. बी. नेवगी, एस. एस. हेबळे, आर.एल. भिंगे, एस. जी. गोखले, टी. जी. एस. अय्यर, डी. रामचंद्रन, एम. एस. कसबेकर, जी. ब्लू. शिवेस्वरकार, आर. डी. त्यागी, यु. डी. राजवाडे, राम गावंडे, एम. जी, नरवणे, उल्हास जोशी, रामराव घाडगे, सुनील वैद्य, भगवंतराव मोरे, संजयकुमार, आर. के. पद्मनाभन, शहीद अशोक कामटे, सुखविंदर सिंग, चंद्रकांत कुंभार, यशस्वी यादव, विजयसिंह जाधव, प्रभारी डॉ. दिगंबर प्रधान, डॉ. मनोजकुमार शर्मा, प्रदीप देशपांडे, एम. बी. तांबडे आणि संजय मोहिते या अधिकार्‍यांनी कोल्हापूर पोलिस दलाची ख्याती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.  

निधड्या छातीच्या अधिकार्‍यांचा वारसा
जी. एस. अय्यर, आर. डी. त्यागी, डी.रामचंद्रन, नरवणे, भगवंतराव मोरे आदी अधिकार्‍यांनी उच्च पदापर्यंत मजल मारली. शहीद अशोक कामटे यांनी 2004-2005 या काळात समाजकंटकांसह गुंड-पुडांना ‘सळो की पळो’ करून कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा उंचावली. निधड्या छातीचा व सामान्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला   अधिकारी 26/11 दहशतवादी हल्ल्यात कामी आला. 
अन् राजकीय आश्रय बोकाळला !

 गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा चेहरा- मोहरा बदलला. लोकसंख्येत कमालीची भर पडली. वाड्या-वस्त्या वाढत गेल्या. तसे गुन्हेगारीचे तंत्रही बदलत गेले. भुरट्या चोर्‍या-मार्‍याऐवजी ऑनलाईन फसवणुकीचा फंडा वाढला. खासगी सावकारीचा सामान्यांना वेढा पडला. राजकीय आश्रयातून संघटित टोळ्यांचा उदय झाला. खंडणीसाठी अपहरणाचा आलेख वाढत गेला. महिलांवरील अत्याचारांत वाढ होत राहिली. 

संघटित टोळ्यांचे बेधडक  कारनामे
बेकायदा शस्त्रास्त्र, अमली पदार्थांच्या तस्करीची दुकानदारी थाटू लागली आहे. आरोग्याला घातक ठरणार्‍या भेसळ दारूची शहर, जिल्ह्यात मोठी उलाढाल सुरू झाली आहे. विविध आमिषांचे गाजर दाखवून कोट्यवधीचा गंडा घालून रोज एखादी टोळी पसार होताना दिसून येत आहे. पोलिस दलात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायद्याचा धाक दाखवून सामान्यांना लुबाडणुकीच्या घटनांचा आलेख वाढताना दिसून येत आहे. गुन्हेगारीतील वर्चस्वासाठी संघटित टोळ्यांचे  कारनामे सुरू झाले आहेत.

शंभरावर सावकारांना कारवाईचा झटका
 मावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते आणि त्यांच्या टिमने वर्षभराच्या कारकिर्दीत प्रभावी कामगिरी बजावित 74 पेक्षा अधिक गुंडांवर मोका, दीडशेवर तडीपार, अन्य अनेकांना कठोर कारवाईचा बडगा उगारून सामान्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा, कॉलेजात टगेगिरी करणार्‍या शेकडो टवाळखोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शंभरावर सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यामुळे नवीन उमेदीच्या पोलिस अधीक्षकांकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. आव्हानांचे शिवधनुष्य पेलताना सामान्यांच्या हितासाठी त्यांनी प्रसंगी कठोर पावले उचलल्यास गैर ठरणार नाही.