Wed, Apr 24, 2019 19:45होमपेज › Kolhapur › शहरातील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न कायम

सर्वेक्षण रखडले

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:43PMकोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रखडले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍नही ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. कोण फेरीवाला हेच स्पष्ट नसल्याने महिन्याला महापालिकेचे सुमारे 25 लाखांचे उत्पन्‍न बुडत आहे. काही ठिकाणी अस्ताव्यस्त फेरीवाल्यामुळे शहर विद्रुपीकरणात वाढ होत आहे. परिणामी काही ठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर वळणावर गेला आहे. 

कोल्हापूर शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नापैकी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा एक प्रश्‍न आहे. 2010 ला शहरातील महत्त्वाच्या ठिकाणावर व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हटविण्यात आले. महापालिका अधिकार्‍यांच्या या कारवाईमुळे अनेक फेरीवाल्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर कारवाईच्या धास्तीने एका फेरीवाल्याचा मृत्यूही झाला. यापूर्वी महापालिका प्रशासनाने त्या त्या जागी व्यवसाय करण्याचे परवाने फेरीवाल्यांना दिले होते; पण आपले दिलेले परवानेच बेकायदा ठरवत महापालिका प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेने इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट या संस्थेकडून शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून घेतले. त्यानुसार शहरात 8 हजार 100 इतक्या फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली. 

महापालिका प्रशासनाने 5 हजार 100 फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक कार्ड तयार करून घेतले. त्यापैकी 3 हजार फेरीवाल्यांनी पैसे भरून बायोमेट्रिक कार्ड नेलेली आहेत. कार्ड घेतल्यानंतर त्यानुसार संबंधित फेरीवाल्यांना महापालिकेकडे महिन्याला तीनशे रुपये भरावे लागणार असल्याने फेरीवाल्यातून कार्ड नेण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. 

महापालिका प्रशासनाने सर्वेक्षणासाठी प्रती फेरीवाल्यामागे सुमारे शंभर रुपये याप्रमाणे आठ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने फेरीवाला झोनही तयार केले होते. तोपर्यंत शासनाचा जी. आर. बदलला. नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश आले. शासनाच्या आदेशानुसार नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदाही प्रसिद्ध केली आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक फेरीवाल्यामागे सुमारे 125 रुपये महापालिका देणार आहे; परंतु कोणतीही कंपनी सर्वेक्षणासाठी पुढे येत नसल्याने तीनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर फक्‍त एका कंपनीने निविदा भरली आहे. परिणामी सर्वेक्षण रखडले आहे. 

कोल्हापूर शहरात सुमारे पंधरा हजारांवर फेरीवाले आहेत, असे फेरीवाल्यांचेच मत आहे. शहरात प्रमुख रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. तसेच मुख्य चौकातही फेरीवाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन आवश्यक

स्पर्धेचे आणि धावपळीचे युग असल्याने जो तो आपापल्या कामात मग्‍न असतो. जितक्या कमीत कमी वेळात जे काही मिळेल त्याकडेच सर्वांचा ओढा असतो. सध्याच्या महागाईच्या काळात सर्वांचीच स्वस्तात स्वस्त मिळविण्यासाठी धडपड असते. त्यातूनच फेरीवाल्यांची संख्या वाढत गेली. आता तर फेरीवाला हा घटक समाजाची गरज बनला आहे. अस्ताव्यस्त पसरलेल्या फेरीवाल्यांमुळे शहरांचे सौंदर्य बिघडू लागले. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर राष्ट्रीय फेरीवाला धोरण तयार करण्यात आले. त्यानुसार फेरीवाल्यांनाही रस्त्यावर व्यवसाय करून उदरनिर्वाहाचा अधिकार बहाल करण्यात आला. त्यामुळे फेरीवाल्यांचे पुनर्वसन आवश्यक आहे.