Thu, Jul 18, 2019 05:05होमपेज › Kolhapur › वाशीतील जखमी मेंढपाळाचा मृत्यू

वाशीतील जखमी मेंढपाळाचा मृत्यू

Published On: Mar 15 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मद्यधुंद स्थितीत पाराच्या कट्ट्यावर डोके आपटल्याने गंभीर जखमी झालेल्या आण्णासो आप्पाजी पुजारी (वय 47, रा. देऊळवाडी, वाशी, ता. करवीर) या मेंढपाळाचा बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे देऊळवाडी परिसरात तणावाची स्थिती आहे. खबरदारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे.

महादेव मंगेश पुजारी (वय 30), अशोक मंगेश पुजारी (35, देऊळवाडी, वाशी) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांना अटक करण्यात आली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजता वाशी येथील बिरदेव मंदिर आवारात पाराच्या कट्ट्यावर ही घटना घडली होती. दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मेंढपाळ आनंदा पुजारी यांचा रविवारी भंडार्‍याचा कार्यक्रम होता. यानिमित्ताने भावकी, ग्रामस्थांसाठी मंदिर आवारात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आण्णाप्पा व संशयित महादेव हे नात्याने चुलतभाऊ आहेत. दोघेही मद्यधुंद अवस्थेत आले होते. स्वयंपाक व जेवणाची भांडी घासण्यावरून त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. त्यातून वादावादी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले.उपस्थितांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला देत वादावर पडदा टाकला. काहीवेळाने पुन्हा त्यांच्यात वादावादी सुरू  झाली. संतप्त महादेव पुजारीने आण्णासो याचे डोके धरून पाराच्या कट्ट्यावर जोरात आपटले. त्यात आण्णासो जखमी झाले.

या प्रकारानंतर संशयिताचा मोठा भाऊ अशोक तेथे आला. जखमी आण्णासो पुजारी त्याच्याही अंगावर धावून गेला. दोघांना जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकीच दिली.दोघा भावांनी आण्णासो यांचे डोके कट्ट्यावर पुन्हा जोरात आपटले. त्यात ते गंभीर जखमी झाले. रक्‍ताने माखलेल्या स्थितीत आण्णासो घराकडे परतला. रात्री साडेदहा वाजता ते बेशुद्ध झाले. भाऊ नानासाहेब पुजारी व नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक बनल्याने मंगळवारी रात्री शासकीय रुग्णालयात हलविले.

आण्णासो पुजारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयासह वाशी, देऊळवाडीतील ग्रामस्थांनी करवीर पोलिस ठाण्यासह शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.पोलिस निरीक्षक दिलीप जाधव घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात दाखल झाले.संशयित महादेव पुजारी व अशोक पुजारी यांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवारी अटक  झाली होती. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडीही दिली होती. संशयितांवर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.