Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Kolhapur › 'अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

'अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

ढोल-ताशांचा दणदणाट, मराठमोळ्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि क्रीडा प्रेमींची उपस्थिती अशा वातावरणात क्रीडानगरी कोल्हापुरातील विविध तालीम संस्था-तरुण मंडळांच्या फुटबॉल संघांच्या कीटच्या रंगाच्या गुढ्या उभारण्यात आल्या. कोल्हापुरात क्रीडानगरीचा भक्‍कम पाया रोवणार्‍या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील व फुटबॉलसारखा रांगडा खेळ विकसित करणार्‍या छत्रपती राजाराम महाराज यांच्या व्हिनस कॉर्नर येथील स्मारकांना अभिवादन करून आणि छत्रपती शाहू स्टेडियमच्या पूजनाने बुधवारी ‘अटल’ चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात झाला. दरम्यान, स्पर्धेचा किक ऑफ गुरुवारी (दि. 29) मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणार असून पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लब ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्यात होणार आहे. कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असणार्‍या रांगड्या  फुटबॉल खेळाच्या चौफेर विकासासाठी आणि मैदान गाजविणार्‍या  खेळाडूंना भक्‍कम आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ऐतिहासिक दसरा चौकात गुढ्या....

स्पर्धेचा किक ऑफ गुरुवारी होणार असला तरी बुधवारी त्याचा दिमाखदार उद्घाटन समारंभ झाला. सायंकाळी ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू व व्हिनस कॉर्नर चौकातील राजाराम महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर स्मारकाभोवती स्पर्धेत सहभागी 17 वरिष्ठ संघांच्या कीटच्या रंगांच्या गुढ्या उभारून त्यांचे पूजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांच्या हस्ते गुढ्यांचे पूजन झाले. यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या प्रतिनिधींचा गौरव कोल्हापुरी फेटा बांधून करण्यात आला. यानंतर ढोल- ताशांच्या गजरात ‘अटल चषकाची’ मिरवणूक काढण्यात आली. सर्व संघांच्या खेळाडूंचे कटआऊट आणि फुटबॉल संदर्भातील फ्लेक्सने सजविलेल्या वाहनातून चषक छत्रपती शाहू स्टेडियमवर नेण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोटारसायकल वरून सहभागी झाले होते. 
 

 

Tags : atalfootball2018, kolhapur Football, Atal Cup Football Tournament,


  •