Thu, Jun 27, 2019 12:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विभागाची हॅट्ट्रिक

कोल्हापूर विभागाची हॅट्ट्रिक

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी (दि. 30) कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाचा निकाल 91 टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 0.40 टक्के इतकी घट झाली आहे. कोल्हापूर विभागाने सलग तिसर्‍या वर्षी राज्य क्रमवारीत दुसरे स्थान अबाधित राखत हॅट्ट्रिक केली आहे. विभागात कोल्हापूर जिल्हा 91.50 टक्केवारीसह अव्वल ठरला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या कमी असली, तरी निकालात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 10.73 टक्के अधिक आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या विभागीय सचिव पुष्पलता पवार, सहसचिव टी. एल. मोळे, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षण अधिकारी सुधीर महामुनी, लेखाधिकारी एस. एल. रेणके यांच्यासह बोर्ड पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला.

कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील 788 कनिष्ठ महाविद्यालयांतील 154 परीक्षा केंद्रांवर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा झाली. कोल्हापूर विभागातून 1,25,786 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 1,25,648 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यामधील 1,14,342 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाची निकालाची टक्केवारी 91 इतकी आहे. मुला-मुलींची तुलनात्मक निकालाच्या टक्केवारी पाहता, कोल्हापूर विभागातून 73,244 मुले परीक्षेला बसली. यातील 61,861 उत्तीर्ण झाली. उत्तीर्णतेचे प्रमाण 84.46 टक्के आहे. परीक्षेसाठी  बसलेल्या 56,480 मुलींपैकी 53,763 मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेची टक्केवारी 95.19 आहे.

सातारा जिल्ह्यातून 38,095 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 38,051 परीक्षेला बसले, यातून 34,679 उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 91.14 आहे. सांगली जिल्ह्यातून  35,579 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 35,548 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 32,037 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 90.12 आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 52,112 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील 52,049 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 47,626 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 91.50 आहे.

सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या उत्तरपत्रिकांची  छायांकित प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रतीची मागणी मंडळाकडे गुरुवार, 31 मे ते मंगळवार, 19 जून या कालावधीत करता येणार आहे. त्यासाठीचा अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध आहे.उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रतिविषय 400 रुपये शुल्क आहे. छायाप्रत घेऊन जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मोबाईल आणि एसएमएसवरून कळविले जाईल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत विद्यार्थ्यांना अर्जात नमूद केल्याप्रमाणे हस्त पोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येईल. एकदा उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिल्यानंतर त्यासंबंधित कोणतीही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळणार नाही.

गैरमार्गाचा अवलंब केलेल्या विद्यार्थ्यांस माहिती अधिकाराखाली उत्तरपत्रिकेची छायाप्रत देता येणार नाही. उत्तरपत्रिकेची छायाप्रत कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्ध करता येणार नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.गुणपडताळणीसाठी  विद्यार्थ्यांना गुरुवार, 31 मे ते शनिवार, 9 जूनपर्यंत विहित शुल्कासह विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व इतर साहित्याचे वाटप  मंगळवार दि. 12  जून  रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयामार्फत त्याचदिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप केले जाणार आहे.