Wed, Apr 24, 2019 11:49होमपेज › Kolhapur › ‘त्या’ अतिक्रमणांवर लवकरच हातोडा

‘त्या’ अतिक्रमणांवर लवकरच हातोडा

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:54PMकोल्हापूर ः प्रतिनिधी
कोल्हापूर-गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरात महापालिकेच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसांची मुदत संपताच अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने शनिवारी स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. 

यावेळी ढवळे यांनी, अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येतील का? 2014 पूर्वीची बांधकामे आहेत, त्यांचे तीन टप्प्यामध्ये धोरण सादर करा. यात महापालिका अटी, शर्तींमध्ये बसतात, अशा इमारती रीतसर करून घेऊ शकतो का? त्यांचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. 2014 पूर्वीचे आहेत; पण नियमावलीत बसत नाहीत, त्याबाबतचे धोरण काय राहणार आणि 2014 नंतरच्या बांधकामांमध्ये जे महापालिका अटी, शर्तींमध्ये बसतात, अशा इमारती रीतसर करून घेऊ शकतो का, त्यांचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. 2014 नंतरचे आहेत; पण नियमावलीत बसत नाहीत, त्याबाबतचे धोरण काय राहणार, यांचा समावेश आहे. नगरसेवक सत्यजित कदम, प्रतिज्ञा निल्ले, दीपा मगदूम, राहुल माने, संजय मोहिते, प्रतीक्षा पाटील, सविता घोरपडे, गीता गुरव, भाग्यश्री शेटके आदींनी चर्चेत भाग घेतला. 
शहरातील हॉटेल परवाना कशा पद्धतीने दिला जातो? रहिवासी अपार्टमेंटमध्ये हॉटेलसाठी परवानगी देता येते का? अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने खाद्यपदार्थ विक्रीसाठी महापालिका परवाना देत नाही. हॉटेलला अन्न-औषध प्रशासन परवाना देते, असे सांगण्यात आले. गाडी अड्डा येथील अतिक्रमण काढण्याचे काय झाले? अशी विचारणा केली. प्रशासनाच्या वतीने सोमवारपासून मोहीम सुरू होईल, असे सांगण्यात आले. म्हाडा कॉलनीत गेले पंधरा दिवस पाणी येत नाही. अधिकार्‍यांना सांगूनही काही कार्यवाही नाही. फोन उचलत नाहीत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने शाखा अभियंता भास्कर कुंभार यांना नोटीस काढू, असे स्पष्ट करण्यात आले. अपंगांच्या केबिन केव्हा मिळणार? यावर प्रशासनाच्या वतीने 173 केबिन दिल्यानंतर केबिन देण्याचे बंद केले आहे. आता 140 लोकांच्या खात्यांवर व्यवसायासाठी पैसे जमा करणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. पांजरपोळ औद्योगिक वसाहत येथे कारखान्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने महापालिकेच्या मालकीची जागा असून, अतिक्रमण काढण्याची कारवाई करू, असे स्पष्ट करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. वर्षभरापासून निर्बीजीकरण करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. परंतु, काहीही झालेले नाही. गायी व भटकी जनावरे कोंडवाड्यात ठेवावीत. खुल्या जनावरांच्या मालकांवर होणार्‍या दंडाची रक्कम वाढवा, अशी सूचना सदस्यांनी केली. कामगारांच्या कामाची वेळ बदलण्याचे काय झाले? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्या अनुषंगाने कर्मचारी संघाचे पत्र आले आहे. कर्मचारी संघ व आयुक्त यांची चर्चा झाल्यावर निर्णय घेऊ, असे स्पष्ट करण्यात आले.