Wed, Jun 26, 2019 12:14होमपेज › Kolhapur › बाल मृत्यूप्रकरणी सरकार गांभीर्याने लक्ष देणार काय?

बाल मृत्यूप्रकरणी सरकार गांभीर्याने लक्ष देणार काय?

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:20AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

एप्रिल 2017 या एकाच महिन्यात राज्यामध्ये एकूण 1 हजार 236 बाल मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहणार काय? शिवाय याबाबत कोणती कार्यवाही केली? असा प्रश्‍न उपस्थित करीत यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केलीय. शिवाय 79 हजार 619 मुले तीव्र कुपोषित गटात आहेत, तर 80 हजार तीव्र कुपोषित मुलांना पोषण आहार मिळत नसल्याकडे देखील आ. पाटील यांनी यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अहवालानुसार, एप्रिल 2017 या एकाच महिन्यात, 1 हजार 236 बालमृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये शून्य ते एक वयोगटातील एकूण 916 बालके तर 1 ते पाच वर्ष वयोगटातील 320 बालके दगावली आहेत. त्यामुळे याकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहणार काय, असा प्रश्‍न आ. सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.

यासंदर्भात चौकशी मागणी देखील त्यांनी लावून धरली. शिवाय 80 हजार तीव्र कुपोषित गटातील बालकांना पोषण आहार मिळत नसल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत सरकार गंभीर आहे की नाही, असा सवाल केला. यावर  महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी एप्रिल 2017 या एकाच महिन्यात, 1 हजार 236 बाल मृत्यूंची नोंद झाल्याचे खरे असल्याचे सांगितले. 

मात्र, हे बालमृत्यू संसर्ग जन्य आजारांमुळे झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय बालविकास सेवेमधील गाव आणि तालुका पातळीवरील 9 हजार पदे आणि 366 प्रकल्पांना बालविकास अधिकारी यांची पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे राज्यात 79 हजार 619 मुले  तीव्र कुपोषित असल्याचेही मंत्री पंकजा मुंडे यांनी कबूल केले आहे.