Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Kolhapur › सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

Published On: Dec 02 2017 1:09AM | Last Updated: Dec 01 2017 11:53PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकरी, कष्टकरी, उद्योग-व्यावसायिकांचे प्रश्‍न सोडवण्यात या सरकारला अपयश आले आहे.त्यामुळेच या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेस कमिटीत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठीचे सर्वाधिकार आ. पंतगराव कदम यांना देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

खा. चव्हाण जिल्हा दौर्‍यावर आले असता त्यांनी काँग्रेस कमिटीत येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नांदेड महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आणल्याबद्द त्यांचा सत्कार करण्यात आला.

खा. चव्हाण म्हणाले, मागील तीन वर्षांत सरकारने जेवढ्या घोषणा केल्या त्यातील एकही पूर्ण झालेली नाही. लोकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे हजारो लोक सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या या आक्रोशाची दखल काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी. सत्ता आम्ही खूप पाहिली आहे म्हणूनच सत्तेसाठी राज्य नको, तर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सत्ता हवी आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील म्हणाले, राज्यातील सरकार खोटी आश्‍वासने देऊन दिशाभूल करत आहे. याविरोधात नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार असून त्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आ. सतेज पाटील, महासचिव पृथ्वीराज साठे, माजी आमदार बजरंग देसाई, भरमू पाटील, संजीवनीदेवी गायकवाड व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी स्वागत, तर शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. 

उपदेश देऊन चालणार नाही

जिल्ह्यातील काँग्रेसचा शत्रू भाजप, सेना, राष्ट्रवादी नसून पक्षातीलच नेते असल्याचे जयवंतराव आवळे यांनी सांगितले. यावर बोलताना खा. चव्हाण म्हणाले, जिल्हा काँग्रेसला मी जवळून ओळखतो. या काँग्रेसमध्ये राज्यात पुढे राहण्याची ताकत आहे. पक्षात छोटे-मोठे वाद असतील तर ते बसून मिटवा. यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल. केवळ उपदेश देऊन चालणार नाही, असा टोला त्यांनी आवळे यांना लावला.

कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाणे खेदजनक

अलीकडे वर्तमान पत्र उघडले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणाला पक्षात घेतले, त्यांना काय-काय देण्याचे आश्‍वासन दिले हेच वाचायला मिळत आहे. कोणाला घोडा, कोणाला हत्ती आणि कोणाला काय देण्याची ते घोषणा करत आहेत. विविध पक्षांतील लोकही त्यांच्याकडे जात आहेत. राज्याला पुरोगामी विचार देणार्‍या या जिल्ह्यात अशाप्रकारे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाणे हे खेदजनक असल्याचे आ. कदम यांनी सांगितले.