होमपेज › Kolhapur › युवतीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाला पोलिस कोठडी

युवतीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाला पोलिस कोठडी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

युवतीवरील अत्याचारप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या पंढरीनाथ कृष्णात पाटील याला मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कीटकनाशक प्यायल्याने प्रकृती गंभीर बनलेल्या पीडितेची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे, असे तपासाधिकार्‍यांनी सांगितले.

शिक्षण संस्थेकडून पाटील याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहाजी कॉलेजमध्ये संशयित काही वर्षांपासून अध्ययनाचे काम करीत होता. प्राध्यापकानेच कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या युवतीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मीडियाद्वारे जवळीक साधून, संशयिताने सहा महिन्यांपासून साकोली कॉर्नर येथील एका सहकारी संस्थेच्या कार्यालयात युवतीला बोलावून लैंगिक शोषण केले होते. अत्याचाराला कंटाळून पीडितेने गुरुवारी सकाळी कळंबा तलावाजवळील उद्यानात कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बेशुद्धावस्थेत युवतीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर गुरुवारी सकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन युवतीचा जबाब घेण्यात येईल. प्राध्यापकाला दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी स्नेहल पाटील यांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने संशयिताला दि. 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयिताकडे रात्रीपर्यंत इनकॅमेरा चौकशी सुरू होती. पीडितेच्या जबाबानंतर चौकशीला गती मिळेल, असेही सांगण्यात आले.