Mon, Jan 21, 2019 14:06होमपेज › Kolhapur › परीक्षेदिवशीच मुलीवर आघात : वडिलांच्या इच्छेसाठी दिली परीक्षा

मुलीने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नी

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा अट्टाहास करणार्‍या कुटुंबीयांना जवाहरनगरातील कदम कुटुंबीयांनी वेगळा संदेश दिला. अविनाश कदम यांच्या पार्थिवाला स्मशानभूमीत येऊन त्यांची मुलगी अस्मिता हिने अग्नी दिला. बुधवारी पहाटे वडिलांचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या शेवटच्या इच्छेखातर दु:ख पचवत तिने बी. फार्म. परीक्षेचा पेपरही दिला. पेपरवरून आल्यानंतर तिने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. छोटी बहीण लक्ष्मीदेखील अंत्यसंस्कारावेळी तिच्यासोबत होती.

जवाहरनगरात राहणारे अविनाश आनंदराव कदम कोल्हापुरी चप्पल बनविण्याचे काम करीत होते. त्यांना अस्मिता व लक्ष्मी अशा दोन मुली आहेत. काही महिन्यांपासून अविनाश कदम आजारी होते. मुलगी अस्मिताने बी. फार्म. करावे, अशी त्यांची इच्छा होती. आजारी असतानाही ते मुलीला दररोज अभ्यास करण्याचा सल्ला देत होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात अस्मिताची परीक्षा सुरू होती. 

बुधवारी पहाटे अविनाश कदम यांच्या रुग्णालयात मृत्यू झाला. यावेळी पत्नी व लहान मुलगी लक्ष्मी रुग्णालयात होत्या. वडिलांच्या निधनाचा निरोप मिळताच ती रुग्णालयात आली. नातेवाईकांनी तिला सावरले. ‘वडिलांची शेवटची इच्छा म्हणून तू बी. फार्म. पूर्ण कर, तू परीक्षा दे,’ अशी समजूत घातली. तिने मन घट्ट करून पेठवडगाव केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. सायंकाळी ती घरी पोहोचली. वडिलांचा मृतदेह घरी आणण्यात आला. तिने शितोंडी हाती धरली, तसेच स्मशानभूमीत बहिणींनी वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला.