Sun, Jul 05, 2020 22:25



होमपेज › Kolhapur › ६ लाखांचा ऐवज लुटणारी टोळी जेरबंद

६ लाखांचा ऐवज लुटणारी टोळी जेरबंद

Published On: Dec 14 2017 1:49AM | Last Updated: Dec 14 2017 1:49AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

मित्रांच्या मदतीने चोरीचा कट रचून पाचगाव (ता. करवीर) येथील दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन 6 लाखांचा ऐवज लुटणार्‍या टोळीचा करवीर पोलिसांनी बुधवारी छडा लावला. दाम्पत्याकडे सतरा वर्षांपासून कामाला असलेल्या म्होरक्यासह चौघांना पोलिसांनी गजाआड केले.

चालक संजय संपत सरदार (वय 40, रा. योगेश्‍वरी कॉलनी), जयसिंग महादेव चौगुले (34, रा. पाचगाव), सिकंदर बादशाह शेख (38, रा. आशियाना कॉलनी, जरगनगर), दत्तात्रय संभाजी भारती (32, रा. रायगड कॉलनी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. सरदार हा फिर्यादी, धान्य व्यापारी शिवलिंग खतकल्ले (60, रा. जगतापनगर, पाचगाव) यांच्याकडे, तर दुसरा संशयित चौगुले हा व्यावसायिक भागीदार विजयकुमार पेडणेकरकडे चालक म्हणून कामाला आहेत. 

मित्रांच्या मदतीने या दोघांनी दि. 3 डिसेंबरला रात्री शिवलिंग व वृद्ध पत्नी लीला यांना ठार मारण्याची धमकी देऊन बंगल्यातील दागिने, रोकड असा सुमारे 6 लाख 20 हजारांचा ऐवज लुटला होता. संशयितानी दिलेल्या धमकीमुळे खतकल्ले यांनी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्यादही देण्याचे टाळले होते.जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना घटनेची माहिती होताच त्यांनी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

पोलिस निरीक्षक जाधव व टीमने टोळीचा छडा लावून म्होरक्या  सरदारसह चौघांना अटक करून त्यांच्या कब्जातून 10 तोळे दागिने, 80 हजारांची रोकड असा 4 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. असे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व सार्वजनिक टेलीफोन बुथवरील कॉल डिटेल्सच्या आधारे मुख्य सूत्रधारासह साथीदारांचा छडा लावण्यात तपास पथकाला यश आल्याचे तपासाधिकारी जाधव यांनी सांगितले.