Sun, Jul 05, 2020 23:22होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा ७ वा बळी; आजरा तालुक्यात एकाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा ७ वा बळी; आजरा तालुक्यात एकाचा मृत्यू

Last Updated: Jun 05 2020 7:43PM

संग्रहित छायाचित्रआजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील मेंढोली येथील माजी पोलिस पाटील महादेव केदारी पाटील (वय ८०) या वृध्दाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता.५) सकाळी आलेल्या स्वॅब तपासणी अहवालात पाटील हे पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्या निधनाने आरोग्य विभाग वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मुंबई, पुणेसह, राज्यातून आलेल्यांची संख्या आजरा तालुक्यात मोठी आहे. सध्या मुंबई, पुण्याहून चाकरमानी आपल्या मूळगावी परतत असून दिवसेंदिवस तालुक्याचा धोका वाढत चालला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत प्राप्त अहवालानुसार आजरा तालुक्याची कोरोनाबाधित संख्या ६५ झाली आहे. दरम्यान, आज नवे चार रुग्ण तालुक्यात सापडले आहेत. त्यामध्ये पाटील यांचा समावेश होता. 

पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होता. कांदिवली मुंबई येथून ते चार दिवसांपुर्वी गावी परतले होते. त्यांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. मात्र दुपारी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी घेवून जात असताना त्यांचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात असणार्‍या पाच जणांना आरोग्य विभागाने कोविड सेंटर येथे दाखल केले आहे. याचबरोबर त्यांचा स्वॅब तपासणीकरीता घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.