Wed, May 22, 2019 23:26होमपेज › Kolhapur › अखेर ‘महावितरण’ला मुहूर्त सापडला

अखेर ‘महावितरण’ला मुहूर्त सापडला

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 11:14PMआजरा ः ज्योतिप्रसाद सावंत

महावितरण कंपनीची महत्त्वकांक्षी समजली जाणारी उच्चदाब वितरण प्रणाली (एच.व्ही.डी.एस.) ची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ऑगस्टपासून ही वितरण प्रणाली कार्यान्वित होणार आहे. शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी सलग वीजपुरवठा करण्याच्या द‍ृष्टीने ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार असून वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे यासारख्या समस्यांमधून शेतकर्‍यांना मुक्‍तता मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाने 5 हजार 67 कोटी रुपये या योजनेकामी मंजूर केले आहेत. उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे ग्राहकांना वीजपुरवठा दिल्यास या प्रणालीवर एका विद्युत रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषी पंप असणार आहेत. यामुळे लघुदाब वितरण हानीमध्ये घट तर होणार आहेच; परंतु त्याचबरोबर लघुदाबामुळे वायर तुटून फ्यूज जात नसल्याने यापूर्वी अपघातासारख्या घटना घडून जीवितहानी व वित्तहानीच्या घडलेल्या घटनांना पायबंद बसणार आहे.

वीज वितरण कंपनीची शेतकर्‍यांकडून हूक टाकून केल्या जाणार्‍या वीज चोरीलाही पायबंद बसणार आहे. ग्राहकांना योग्य दाबाचा वीजपुरवठा झाल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे थांबणार आहे. यामुळे ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत तर होणार आहेच. परंतु, त्याचबरोबर 440 व्होल्ट क्षमतेने वीज पुरवठा होणार असल्याने वीज असल्याने मोटर्स जळणे हे प्रकार ही कमी होणार आहेत. उच्चदाब वाहिनी ही उपकेंद्रातून ब्रेकद्वारे नियंत्रण होत असल्यामुळे वीज पुरवठा करणार्‍या तारा तुटल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित होणार आहे. असे विविध फायदे या उच्चदाब वितरण प्रणालीमुळे शेतकर्‍यांबरोबरच महावितरण कंपनीला होणार आहे.

एप्रिल 2017 पासून प्रलंबित असणार्‍या शेती पंपाच्या वीज जोडण्याकरिता ही यंत्रणा राबविली जाणार आहे. 2 लाख 50 हजार रुपयांच्या आतील खर्चाच्या वीज जोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. व त्यावरील खर्चाच्या वीज जोडण्यांकरिता वाट पाहावी लागणार आहे. व्यापारी संकुले, वाड्या-वस्त्या, वीज चोरीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी उच्चदाब वाहिनी प्रणाली प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना, कृषी पंप अनुशेष योजना, विशेष पॅकेज योजना व राज्य शासनाच्या इतर अनुदानित योजना इत्यादी योजनेंतर्गत राबविल्या जाणार्‍या या प्रणालीमध्ये कृषी पंप ग्राहकांना मागणी केलेल्या जोडण्यांनुसार 10 केव्हीए, 16 केव्हीए व 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र देण्यात येणार आहे. ज्या कृषी पंप ग्राहकांचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीपासून 100 मीटर इतके आहे. अशा ग्राहकांना दोन खांबांपर्यंतची लघुदाब वाहिनी एरिअल बंच केबलद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे.

योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कृषी पंपांच्या नवीन जोडण्यांकरिता संबंधित शेतकर्‍याला या प्रणालीसाठी काहीही खर्च करावा लागणार नाही. अडीच लाखांवरील खर्चाच्या जोडण्यांना मात्र उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्‍यांची वीजपुरवठा खंडित होण्याची डोकेदुखी यामुळे निश्‍चितच कमी होणार आहे.