Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › तुरंबेत विठ्ठलाचे डोळे चोरीस गेले अन् आलेदेखील

तुरंबेत विठ्ठलाचे डोळे चोरीस गेले अन् आलेदेखील

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:12AMतुरंबे : वार्ताहर

तुरंबे (ता. राधानगरी) येथे भुरट्या चोरांनी आता कहरच केला आहे. किरकोळ चोर्‍या पचल्या. यामुळे आता देवदेवतांच्या चांदीच्या डोळ्यांची चोरी रविवारी पहाटे झाली. हे डोळे कोणी विकत घेतले नसल्याने पुन्हा ते डोळे विठ्ठल मंदिराच्या कोपर्‍यात आणून टाकले. यापूर्वी झालेल्या चोरीची कोणी तक्रार दिली नसल्याने  गावातीलच भुरट्या चोरांनी विठ्ठलाच्या डोळ्यांची चोरी केल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे.

तुरंबे गावात गेल्या सहा महिन्यांपासून भुरट्या चोर्‍यांमध्ये वाढ झाली आहे.  दारू पिण्यासाठी दारात लावलेल्या मोटारसायकलींमधील पेट्रोल चोरणे, झाडांवरील नारळ चोरणे, पिण्याच्या पाण्याच्या मोटारींबरोबरच ट्रॅक्टर ट्रॉलीतील साहित्याच्या चोरीत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल भरलेली बाटली फक्‍त 10 रुपये दिल्यावर मिळते, तर नारळाचे अख्खे पोते 50 रुपयाला मिळते. पाण्याची मोटार 100 रुपयाला मिळते, असे घरगुती वापराचे साहित्य कमी दरात मिळत असल्याने घेणार्‍यांची संख्याही वाढली आहे. 

किरकोळ चोर्‍या पचल्याने आता चोरट्यांनी गावातील मंदिरांतील देवदेवतांना लक्ष्य केले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना चांदीचे डोळे बसवले आहेत. चोरट्यांनी रविवारी पहाटे मूर्तींचे डोळेच चोरून नेले. दरम्यान, महादेव जरग पूजेसाठी मंदिरात आले असता देवांच्या मूर्तींवर डोळे नसल्याचे दिसून आले. यानंतर सर्व भक्‍तांनी मंदिरात शोधाशोध केली, मात्र सापडले नाहीत. यामुळे सर्वजण चिंतेत होते. याची चर्चाही सर्वत्र सुरू झाली. महिलावर्गातून तर संतप्‍त प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर काही वेळाने मंदिरात चोरट्याने डोळे आणून टाकले.