Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Kolhapur › सांसद आदर्श ग्राम योजनेतील उत्साह मावळतोय

सांसद आदर्श ग्राम योजनेतील उत्साह मावळतोय

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:38AMकोल्हापूर : विकास कांबळे

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये सांसद आदर्श ग्राम योजनेचा समावेश आहे. ही योजना जाहीर करताना विकासकामांसाठी थोडाफार निधी मिळेल, अशी खासदारांची अपेक्षा होती. मात्र, लोकसभेची मुदत संपत आली तरी एक रुपयादेखील निधी यासाठी न मिळाल्याने ही योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये यापूर्वी लोकसहभागातून अनेक योजना राबविण्यात आल्या. त्यातील काही योजना यशस्वीदेखील झाल्या. लोकसहभागातून ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी सुरू केलेले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान खूप गाजले. यातूनही काही गावांचा विकास होण्यास मदतही झाली. मात्र, पुढे ही योजना संबंधित खात्याचे मंत्री बदलल्यानंतर आणि या योजनेतच राजकारण शिरल्याने या योजनेला मिळणारा प्रतिसाद हळूहळू कमी होऊ लागला आहे; पण आजही काही गावे लोकसहभागातून विकास करताना दिसत आहेत. साधारणपणे त्याच धर्तीवर केंद्र शासनाने सांसद आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेमध्ये गावातील स्थानिक गरज लक्षात घेऊन लोकांच्या सहभागातून योजना राबविण्याचा उद्देश आहे. गावाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्य गावांमध्येही सुधारणा व्हावी, हादेखील हेतू या योजनेमागचा आहे. गेल्यावर्षापर्यंत या याजनेत देशातील 2 हजार 400 गावांची निवड स्थानिक खासदारांनी केली आहे. इंदिरा आवास योजना, पंतप्रधान सडक योजना, मनरेगा या योजनेतील कामे करताना सांसद आदर्श ग्राम योजनेत ज्या गावांची निवड करण्यात आली आहे त्या गावांत प्राधान्याने करावयाची आहेत. याशिवाय ग्रामपंचायत आपला स्वत:चा निधीदेखील या कामांसाठी वापरू शकते.

जिल्ह्यातील तीन खासदारांनीदेखील या योजनेसाठी गावांची निवड केली आहे. याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव या योजनेत दत्तक घेतले आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द (ता. चंदगड) व कसबा तारळे (ता. राधानगरी) ही दोन गावे सांसद आदर्श गावे योजनेत दत्तक घेतली आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी पेरीड (ता. शाहूवाडी) व बुबनाळ (शिरोळ), खासदार संभाजीराजे यांनी येळवण जुगाई (शाहूवाडी) व जाखले (ता. पन्हाळा) ही दोन गावे घेतली आहेत. सांसद आदर्श ग्राम योजनेत घेतलेल्या गावांमध्ये शासनाकडून थोडाफार तरी खास निधी गावांसाठी मिळेल, अशी खासदारांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी गावातील लोकांच्या बैठका घेऊन त्यांची मते आजमावून घेतली. गावात काय कमी आहे, याची माहिती घेतली. त्यानुसार गावांचा विकास आराखडा तयार करून घेतला. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली तेव्हा मात्र निधीची कमतरता भासू लागली. शासनाच्या सध्या सुरू असलेल्या योजनांतूनच निधी उपलब्ध करून घेण्याच्या सूचना दिल्या; पण तो निधी मिळवितानाही लावण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करताना ग्रामपंचायतींनाही अडचणीचे ठरू लागले. शासनाचा त्यासाठी खास निधी नाही, आहे त्या योजनांमधून निधी मिळविण्यात येणार्‍या अडचणी, यामुळे खासदारांनी सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेल्या गावांमध्ये काम करताना अडचणी येऊ लागल्या. कारण, एका गावासाठी निधी खर्च करण्यावर त्यांच्याही मर्यादा आहेत. त्यामुळे सुरुवातीला सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये खासदारांचा जो उत्साह होता तो आता मावळू लागला आहे.