ट्रकखाली सापडून रुग्णालय कर्मचार्‍याचा अंत

Last Updated: Jun 03 2020 1:04AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

रुग्णालयातील काम आटोपून घरी निघालेल्या कर्मचार्‍याचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. सुरेश शांतवन माजगावकर (वय 51, रा. पाचगाव) असे मृताचे नाव आहे. ट्रकने सुमारे तीस फुटांपर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. नागरिकांनी ट्रकचालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. 

सुरेश माजगावकर हे नागाळा पार्कातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला होते. मंगळवारी रात्री रुग्णालयातील काम आटोपून ते पाचगावकडे निघाले होते. दहाच्या सुमारास व्हिनस कॉर्नर चौकात स्टेशन रोडकडे निघालेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. माजगावकर यांची दुचाकी ट्रकच्या समोरील भागात अडकून ट्रकसोबत सुमारे तीस फुटांपर्यंत फरफटत गेली. डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्‍तस्रावाने माजगावकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ट्रकचालक अब्दुल रजाक गदक (वय 44, रा. चलमट्टी उग्गेनकेरी, ता. कलघटगी, जि.   धारवाड) याला नागरिकांनी पकडून चोप दिला. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.