होमपेज › Kolhapur › ई-वे बिलची एक जूनपासून सक्‍ती

ई-वे बिलची एक जूनपासून सक्‍ती

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 12:56AMकोल्हापूर : विजय पाटील

मुंबईतून पाच लाखांचा घेतलेला माल कागदोपत्री खरेदी असायची कर्नाटकची; पण प्रत्यक्षात तो माल पोहोचवला जायचा दुसर्‍याच राज्यात. कागदावर सगळा आलबेल व्यवहार असायचा; पण प्रत्यक्षात हा सगळा ब्लॅकचा मामला होता, हे उघड होते. यापूर्वी असे व्यवहार चालवणे तसे सोपे होते; पण आता मात्र एक जूनपासून सर्व राज्यांना इलेक्ट्रॉनिक वे बिल (ई-वे बिल) लागू होणार असल्याने जे हा ब्लॅकचा व्यवहार करत होते, त्यांची कोंडी झाली आहे. ही मंडळी धास्तावली आहेत.

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पन्‍नास हजार रुपयांवरच्या माल वाहतुकीस एक एप्रिलपासून ई-वे बिल लागू झाले आहे; पण राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठी मात्र महाराष्ट्रात ही प्रणाली अद्याप लागू झालेली नाही. केंद्र सरकारच्या वित्त विभागाने एक जूनपासून ई-वे बिल सक्‍तीचे केल्याने ते आता आगामी काही दिवसांत सुरू होईल. वरवर पाहता ई-वेल बिल प्रणालीने ‘ब्लॅक’ माल व्यवहारांचे कंबरडे मोडून टाकले आहे. कारण ज्याचे बिल त्यालाच हा माल पोहोचवायचा आहे.

तसेच माल वाहतुकीच्या अंतरावर माल पोहोचवण्याची वेळमर्यादाही निश्‍चित करण्यात आली आहे. समजा मुंबईतून निघालेले माल वाहतुकीचे वाहन हे खरेदीदाराकडेच जाऊन माल उतरवेल, अशा पद्धतीचे पुरेपूर निर्बंध या प्रणालीच्या माध्यमातून घालण्यात आले आहेत. बिलिंगची पद्धत ऑनलाईन असल्याने यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच एखाद्या अधिकार्‍याने जर तपासणीसाठी वाहन जास्त वेळ थांबवले, तर संबंधित अधिकार्‍यालाही याबाबत रितसर खुलासा करावा लागणार आहे. जीएसटीएस नेटवर्कच्या अधिपत्याखाली ही प्रणाली राबवली जात आहे. याबाबतचे निर्णय जीएसटी कौन्सिलकडून जाहीर करण्यात आले आहेत.

ई-वेल बिलासंदर्भात आम्ही वाहतूक संघटनांची बैठक घेऊन स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. ई-वे बिलची जबाबदारी ही खरेदी-विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची आहे. आमचा वाहतुकीपुरताच सहभाग राहणार आहे, असे जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.